पान:गांव-गाडा.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५६      गांव-गाडा.


नियम असूं शकेल; जसें, क्षत्रियाचा धंदा पतकरला तर रणांत बापाची देखील भीड धरूं नये. परंतु वैयक्तिक गुणांचा उपयोग न करतां अमुक कुडीत जन्मास आला म्हणून अमुक धंदा केला पाहिजे, अशी ईश्वरा इच्छा नसावी. कारण कोणताही देव असे सांगणार नाही की, मांगाच्या पोरांनी चोऱ्या कराव्यात, अगर कोल्हाटणीने व्यभिचार करावा. आईबापांचा प्रामाणिक धंदा करण्यांत आईबापांचा व मुलांचा पुष्कळ फायदा असतो, म्हणून पिढीजाद धंदे व जातधंदे आस्तित्वात आले; आणि त्यांवर मारुतीच्या शेंदराप्रमाणे धर्माचे कवच चढले. परंतु पिढीजाद धंदा मुलाला साध्य होण्यासारखा किंवा किफायतशीर नसला तर त्याला दुसरा धंदा पाहतां येऊं नये हा शुद्ध जुलूम आहे. तसेच, नैसर्गिक किंवा संपादित गुणांमुळे एखाद्याने एखादा धंदा धरणे किंवा सोडणे निराळे, आणि अमुक आईबापांच्या पोटी जन्मास आलों म्हणून त्यांचा धंदा देवाने आपल्याला लावला, दुसरा धंदा आपल्याच्याने होणार नाही, अशा धर्मोपदेशावर वडिलोपार्जित धंद्याहून इतर धंद्यासबंधाने शारीरिक, मानसिक व नैतिक अपात्रता व्यर्थ कबूल करणें निराळे. तेव्हां व्यवसायाला जातधर्माचे बंधन नको. ज्या त्या व्यक्तीला आपापल्या शारीरिक, मानसिक, आणि सांपत्तिक अनुकूलतेप्रमाणे योग्य तो धंदा करण्याची पूर्ण मुभा पाहिजे. त्याशिवाय धंद्यांमध्ये हल्ली जी कामकऱ्यांची विषम वांटणी दिसून येते ती नाहीशी होणार नाही. सुधारणेची सर्व मदार व्यक्तिस्वातंत्र्यावर असते. ते ज्या समाजांत नाही त्याच्या चलनवलनाचे क्षेत्र आंत आंत येत जाऊन अखेर तो नामशेष होतो हे प्रमाणसिद्ध आहे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे समाजहितवर्धनास जरूर तितकी निर्बंधने पाळून वागण्याची मोकळीक. असो. ह्याप्रमाणे जात आणि धंदा ह्यांची फारकत झाली म्हणजे जातिधर्माचं स्तोम पुष्कळ कमी होईल, बऱ्हाणी जातींना भरपूर उद्योग भेटेल आणि धर्माच्या नांवावर चालत असलेले अनेक अनाचार व दुराचार ह्यांनी बंदीत टाकलेल्या अनेक अज्ञजनांची मुक्तता होईल.

 सध्यां जातिपरिषदा व संमेलनें भरत आहेत. त्यांनी मनावर घेतल्यास वर सुचविलेल्या सुधारणांपैकी पुष्कळ त्यांना धर्माचार्यांच्या तोंडा-