पान:गांव-गाडा.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २५५

त्याचे उत्सव व योग्यायोग्य भगत ह्यांपायीं समाज किती दिवस बुडूं द्यावयाचा ? हे बंड मोडणें कालावधीचे काम आहे हे कबूल आहे. पण ते मोडण्याच्या उद्योगाला धर्माचार्य लागले आहेत असे दिसत नाही. आपापल्या कळपांच्या कमी-अधिक भाराबद्दल ख्रिस्ती मिशनरी जसे दक्ष असतात, त्याप्रमाणे आमचे धर्माचार्य चालत्याबोलत्या देवांची देवळे म्हणजे रंजल्या-गांजलेल्यांच्या झोपड्या-पाले पाहतील, आणि त्यांच्या धार्मिक उन्नतीचा प्रयत्न करतील तर काय एक होणार नाही ? वृथा जात्याभिमानाला न पेटतां जर जातिजातींचे मेहत्रे, गुरु, मागत्ये, पाटील चौगुले ह्यांनी 'असून अडथळा आणि नसून खोळंबा' व 'शेळीचें शेपूट अब्रूही झांकीना आणि माशाही वारीना' अशाप्रकारचे वतनी मानपान आणि हक्क सोडले तर रूढीचें फाजील बंड मोडेल, किरकोळ कामांत वायफट वेळ जाणार नाही, त्यांचा सांपत्तिक फायदा होईल, आणि जातिजातींचा पुष्कळ कामांतला बेबनाव नाहीसा होईल.

 कामाला बाट नाहीं, ह्या तत्त्वाचे साम्राज्य झाले पाहिजे. त्याशिवाय हा धंदा सोंवळा आणि तो धंदा ओंवळा, हे काम सिद्ध आणि तें निषिद्ध असले भेद नाहीसे होत नाहीत; आणि काम व कामकरी ह्यांची फुकटाफुकट अडवणूक व बुडवणूक होतां राहत नाहीं, ब्राह्मण डॉक्टर गुरामाणसांचे कातडें शिवतो, प्रेत फाडतो, पण तो बाटत नाही. मग मेलेलें जनावर महारांखेरीज इतरांनी पुरणे धर्मबाह्य कां मानावें ? तबला मढविल्याने जर कोणी बाटत नाही, तर कुणब्यानें मोटेला टांचा कां मारूं नये? अघोर पातकें व गुन्हे करण्याने जात बाटत नाही, आणि पोटासाठी हलके किंवा गदळ काम इमाने इतबारे करण्याने ती का बाटावी? असली चमत्कारिक स्थिति बदलली पाहिजे. हे जर पटत असेल तर धंद्यांतील सोवळ्याओंवळ्याचे हास्यास्पद प्रकार ताबडतोब बंद झाले पाहिजेत. त्याशिवाय कारखाने एकतंत्री चालणार नाहीत, आणि सर्वांना भरपूर काम लागून हुन्नर ऊर्जित दशेला येणार नाहीत. अमुक धंदा पत्करला तर अमुक आचरण करणे हा धर्म किंवा ईश्वरी