पान:गांव-गाडा.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५४      गांव-गाडा.

यांचा इतका सुळसुळाट झाला आहे की, शेजाऱ्यापाजाऱ्यांंत लघुत्व न येतां आला दिवस कसा साजरा करावा याची घर चालविणाराला पंचाईत पडते, व घरच्यादारच्यांपैकी कोणाला कांहीं कमी पडलें कीं टोले ठोसरे खावे लागतात. चारचौघांत वागावयाचे असते, तेव्हां शेजाऱ्यापाजाऱ्यांंच्या घरी सण झाला आणि आपण न केला तर आपल्या पोराबाळांना वाईट वाटतें. सबब सालांतून नित्यनैमित्तिक म्हणून शेपाऊणशे सण छातीचा कोट करून करणे भाग पडतें. शिमग्या-दिवाळीसारखे सलग सण पुरवले; पण एकट दुकट सणाचा खर्च जास्त येतो, आणि दर सणाला महार मांग हक्कदार ह्यांचा सशेमिरा कांही केल्या चुकत नाही. तरी समाजाच्या सध्यांच्या निष्कांचन स्थितींत हे इतके सण, उत्सव त्याला झेंपण्यासारखे आहेत कीं नाहीत, हे धर्माचार्यांनी ठरवून त्यांची संख्या हटवावी. जर सणांची व उत्सवांची संख्या हटविली तर पुष्कळांचा उपासमार व तानापाजणी वांचेल. तसेच ‘ एकमेवाद्वितीयं’ ची उच्चतम ध्वजा जगभर फडकविणाऱ्यांंच्या शिष्यांनीं मरेआईच्या पूजेसाठीं पांच-पांचशे रुपयांना खोरीस यावें, ख्रिस्ती मांगांकडून तिला तुष्ट करण्याची मोघाशा धरावी, ग्रहण अमावास्येला महारांमांगांना दाने करावीत, वासुदेव, पांगूळ, तिरमल, वाघ्ये, मुरळ्या, पोतराज,हिजडे, गोंधळी, तेंलंगीकोळी, इत्यादिकांना देवदेवतांचे आडत्ये किंवा लाडके समजावें; हें शोभतें काय ह्याचाही विचार झाला पाहिजे. श्रेष्ठांच्याठायीं ईश्वरी अंश आहे असें भगवंतानें सांगितले आहे. परंतु हिजडे, रक्तदोषाचे रोगी, देवीचे भक्त म्हणून,आणि असेच इतर विकल, कृपण, मेंद कोण्याना कोण्या देवाचे, पिराचे भक्त म्हणून, हक्कानें दक्षिणा मागतांना पाहिले म्हणजे असें मनांत येतें की, ज्याप्रमाणे बहुजनसमाजामध्ये देवपूजनाच्या पंक्तीला पिशाचपूजन येऊन बसले, त्याप्रमाणे दात्यागृही त्याच्या अज्ञानानें विकलानुकंपेचें विकलाराधन होऊन तें श्रेष्ठाराधनाच्या पंक्तीला येऊन बसलें; आणि विद्वान् साधु, संत तसे विकल, मंद सुद्धां हक्कानें दान मागते झाले. असो. हिंदुधर्माचीं तत्वें इतकीं उदात्त असतांना हजारों देव आणि