पान:गांव-गाडा.pdf/274

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २५३

 प्रत्यवाय, देवतोत्सव,आणि जातिजातींचे वतनदार गुरु, मेहत्रे, व मागत्ये ह्यांनी हिंदु समाजाला सतावून टाकले आहे हे मागे सांगितले आहे, व प्रत्यवायांची उदाहरणेही दिली आहेत. वड्डर व गोंड ह्या जातींच्या बायकांनी चोळी घालूं नये; मांग गारोडी, फांसपारधी वगैरे जातींनी केस मुळीच काढू नयेत, असले अनेक प्रत्यवाय जातधर्म व कुलधर्म होऊन बसले आहेत. त्यांची धर्माचार्यांनी व समाजसुधारकांनी चौकशी करून, जे धर्माचें नांव बद्दू करतात, आणि ज्यांचा धर्माशी अर्थाअर्थी संबंध नाहीं असले प्रत्यवाय आचारकांडांतून हुसकून लावले पाहिजेत. तेवढ्यासाठी जातिजातींची नीट समजूतही पण घातली पाहिजे. हिंदुसमाजाचे सूक्ष्म निरीक्षण केले, तर त्याच्या मागें देवपितरांचे सणवार इतके लागले आहेत की, साधारण मध्यम स्थितींतील लोक सुद्धा बेजार झाले आहेत असें दिसेल. चैत्रांत वर्षप्रतिपदा, रामनवमी, हनुमानजयंती व पौर्णिमेचा कुलाचार; वैशाखांत अक्षयतृतीया, नृसिंहजयंती, भावुका ( पांडवांची अमावास्या ); ज्येष्ठांत दशहरा, वटसावित्री; आषाढांत दोन एकादशा, द्वादशा, व्यासपूजा, दिव्याची अमावास्या; श्रावणांत सोमवार महादेवाचा, मंगळ-शुक्रवार देवीचे, बुधवार-गुरुवार बुध-बृहस्पतीचे, शनिवार नागनरसोबाचा, आदितवार सूर्यनारायणाचा, इत्यादि वांटणी होऊन शिवाय नागपंचमी, सक्रोबा, नारळीपौर्णिमा, गोकुळअष्टमी, पिठोरी अमावास्या-पाळा; भाद्रपदात हरतालिका, गौरी, गणपती, ऋषिपंचमी, वामनद्वादशी, अनंतव्रत, महालय; अश्विनांत नवरात्र, दसरा, कोजागिरी, दिवाळी; कार्तिकांत दिवाळी, दोन एकादशा, द्वादशा, तुलशीविवाह, वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा; मार्गशीर्षांत चंपाषष्ठीचें नवरात्र, नागदिवें, दत्तजयंती, पौषांत संक्रांति; माघांत वसंतपंचमी, रथसप्तमी, पौर्णिमेचा कुलाचार, महाशिवरात्र; फाल्गुनांत शिमगा, तखतराव, खेरीज मोहरम नाताळ असे सणच बोकाळले आहेत. ह्या सामान्य सणांखेरीज अनेक पंथांचे व गांवांचे अनेक विशेष सण, यात्रा, उरुस व उत्सव आहेत. सण कुलधर्म, व जातिजातींचे आणि गांवोगांवचे गुरु मागत्ये भिक्षुक ह्यांची संभावना,