पान:गांव-गाडा.pdf/273

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५२      गांव-गाडा.

आजचे घटकेला धर्माचार्यांना व समाजनायकांना सर्वांत श्रेष्ठ असें पुण्यकार्य एकदिलाने करावयाचे असेल तर ते हे आहे. ते वाट पहात आहे की,व्रात्य-स्तोमाला(आर्य-बाह्यांना आर्य धर्माची दीक्षा देतांना शुद्धीकरणार्थ जो यज्ञ करीत तो.) आरंभ केव्हां होतो, आणि कोट्यवधि दिशाभूल झालेले अंधपरंपरेचे गुलाम माणुसकीत केव्हां येऊन बसतात. तरी परमेश्वराला स्मरा, आपल्या जबाबदारीला जागा, आणि कोट्यवधि माणसांचा परमेश्वराने दिलेला मनुष्यजन्म धर्माच्या नांवावर विफल व दुरुपयोगी होऊ देऊ नका. त्यांच्या घरकुल्यांनी, झोपड्यांनी व पालापालांनी जाऊन त्यांना धर्मशास्त्रांतील बोधामृत पाजा, त्यांचा आचार निषिद्ध आहे अशी त्यांची समजूत घाला, आणि त्यांना हातीं धरून सन्मार्गावर आणा. महाराष्ट्रांत संतमंडळीने (विष्णुदास उर्फ वारकरीपंथाने) निकृष्ट जाती सुधारण्याचे बरेच काम केले. रोहिदास, चोखोबाराया यांनी चांभार, महार, मांग ह्यांची दानत पुष्कळ सुधारली. स्वामी नारायण पंथ व नुकताच उदयास आलेला दादुराम धाराळा ह्यांनी गुजरातेतील कोळी वगैरे जातींतले पुष्कळ गुन्हेगार सुधारले. आर्यब्राह्म-प्रार्थनासमाज ह्यांनीही निकृष्ट जाती सुधारण्याचे काम हाती धरले आहे. पंथसंख्या न वाढवितां हे काम होईल तर ते जास्त उपकारक व टिकाऊ होईल. सुमारे सहासात कोटी लोक हिंदु आहेत, तोपर्यंत अस्पृश्य असतात, आणि तेच मुसलमान अथवा खिस्ती झाले म्हणजे स्पृश्य होतात ! ' पानी तेरा रंग कैसा तों जिसमे मिलाय वैसा. ' किंवा “माथा समर्थाचा शिक्का । धाक पडे ब्रह्मादिका ॥' असल्या शास्त्राला म्हणावे तरी काय ? रानांत हिंडले तर लाकूड मिळत नाही, आणि सोन्यासारखी माणसें शेजारीपाजारी रहात असून त्यांना असें डावलावावयाचे हे पुण्य आहे काय ? हा कलंक ह्या लोकांना आहे असें म्हणण्यापेक्षा सबंध हिंदु समाजाला आहे, असे म्हटले तरी चालेल. तर तो धुवून टाका. म्हणजे दोन धंदे जास्त करण्याला त्यांनाही मोकळीक होईल; आणि इतरांनाही दोन माणसांचे काम एकावर भागवितां येईल.