पान:गांव-गाडा.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५०      गांव-गाडा.

आहे. तेव्हां पहिल्याने त्याच्यावरील बोजे एकाकडे सारले पाहिजेत. सारासारीला बाहेरून शेज लावावयाचे म्हटले ह्मणजे ना हिंदू ना मुसलमान, ही जी वटवाघुळासारखी आमची अवस्था झाली, ती नाहींशी केली पाहिजे. तेहतीस कोटी देवांच्या भगतांनी पिरापुढे ऊद जाळण्यांत किंवा पैसा, सुपारी, नारळ, खारीक, ठेवण्यांत, ताबुदांत हैदोस घालण्यांत, दहापांच फकीर जेऊ घालण्यांत, हिजड्यांना किंवा सवागी फकिरांना दक्षिणा देण्यांत, महमदी धर्म वाढतो, किंवा एकंदर मुसलमान समाजाला मोठेसें द्रव्यसाह्य मिळते असे नाही. होत असल्यास त्यांत महमदीयांची धर्महानिच होते, असे प्रांजलपणे कबूल करावे लागेल. पण असल्या ओढाळपणानें हिंदूंचे मात्र सर्व प्रकारे नुकसान होत आहे. धर्म एका विशिष्ट लोकसमुदायासाठी केलेला नसून सबंध चराचर जगासाठी आहे, व कोणत्याही धर्मातील ग्राह्यांश कोणत्याही धर्मानुयायांनी पत्करावा. त्याप्रमाणे आमच्या दावल मलिकी हिंदूनी कांहीं पत्करला आहे काय ? त्यांनी फक्त 'पिरगोबा ! सुनेने माझ्या मुलाला मोहिनी घातली, तो जर माझ्याशी धरलेला अबोला सोडील तर लोटांगणाचे पांच गुरुवार करीन;' असला भाग पत्करला आहे. तेवढ्यापुरते हे पिरा-फकिरांना नमणार. मद्यमांसाचा नैवेद्य लागणाऱ्या आदिशक्तीला सुद्धां बकरें शुद्ध करण्यासाठी मुलान्याचा फात्या लागतो, इतकी ती पराधीन कां व्हावी ? हिंदु खाटकांना बकरें मारण्याची कोणत्या हिंदु देवाने मनाई केली आहे ? हत्या करणे पाप असेल तर मुलाना अधिकारी करणे म्हणजे उपाध्याचे हातून साप मारविण्याइतकेंच भेकड स्वार्थाचे लक्षण नव्हे काय ? आपला देव आपले मनोरथ पूर्ण करील असा भरंवसा हिंदूंना नाही. त्यांमध्ये सत्यधर्माचं अज्ञान पसरले आहे. त्याचेच फळ ही अश्रद्धा होय. तेव्हां धर्माधिकाऱ्यांनी व समाजसुधारकांनी हिंदूंना ह्या बावळट अश्रद्धेतून मुक्त करून त्यांचा स्वधर्मावर विश्वास दृढ केला पाहिजे. परधर्मावरील व्यभिचारी भक्ति गेली म्हणजे स्वधर्मावरील भक्ति अव्यभिचारी होते. असें झाले म्हणजे हिंदुधर्माचे स्वरूप तेजस्वी होऊन इस्लामीधर्माचाही डाख