पान:गांव-गाडा.pdf/270

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २४९

गुरे मारवितात. खानदेशांत भिल्ल पूर्वी स्वतःपुरती दारू गाळीत, व खाण्यापिण्यापुरत्या लहानसान चोऱ्या करीत. वाणी लोक त्यांच्यामध्ये रहावयास आल्यानंतर ते मोठाले गुन्हे करूं लागले, आणि चोरीचा माल बहुतेक फुकटांत मिळून वाणी मात्र गबर झाले, व भिल्ल पूर्वीप्रमाणेच अन्नाला महाग दिसतात. हीच स्थिति सर्वत्र असणार. कांहीं व्यापाऱ्यांनी गुन्हेगार चाकरीस ठेवल्याचा बोभाटा आहे. ते गुन्ह्यांत सांपडले तर खटला चालविण्यासाठी सदर व्यापारी त्यांच्यातर्फे वकील देतात, आणि ते तुरुंगांत गेले तर त्यांच्यामागे त्यांची बायकापोरें पोसतात. आपलपोट्या, अकलवान् समाजाचा अक्कलमंद समाजाशी संबंध जडला म्हणजे अक्कलमंदाची अधिक अवनति होते, हा समाजशास्त्राचा सिद्धांत आहे. हल्लींच्या मन्वंतरांत गुन्हे छपविण्याची साधनें वाढली आहेत. नानाप्रकारच्या विलासाच्या व चैनीच्या चिजांनी बाजार फुलले आहेत, व त्या पैशानें प्राप्त होतात. दुसऱ्याचे हितानहिताचा विचार न करता पैसा पैसा करणारांची संख्या उमाप वाढत आहे, व दुराचारी जातींचा संबंध अनेक तऱ्हांंच्या सज्जनदुर्जन देशी परदेशी व्यापाऱ्यांशी आला आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला असतां सबंध जातींच्या जाती दुराचरणी ठेवणे म्हणजे न विचारतां चोराला वाट सांगत सुटणे आहे की नाही हे ज्याचे त्याने आपल्या अन्तर्यामी शोधावें.

 ज्या त्या वस्तूमध्ये व कृत्यामध्ये धर्म घुसडल्यामुळे हिंदु लोकांमध्ये धर्मभोळेपणा वाढत जाऊन हिंदु समाजाचा कोंडमारा झाला आहे,आणि धर्माच्या बाबींच्या अनेक प्रकारच्या भाराखालीं तो पार गुदमरून चेंगरून गेला

-----

 १ निजामशाहीतल्या एका वरिष्ठ गोऱ्या पोलीस अंमलदाराने असें सांगितले की, एकदा त्यांच्या स्वारीतल्या गाडीची मोठी बैलजोडी महारांनी मारली; आणि तपासाअंती जमाखर्चावरून असे कळले की, त्यागांवचे महार ज्या खाटकाची कुळे होती त्याने त्या सालांत हाडकाकातड्याची वीस हजार रुपयांची उलथापालथ केली. आपोआप मेलेली जनावरे ह्यांत कांही असतील, पण मुद्दाम मारलेलीही पुष्कळ असावींंत असा अंदेशा घेण्यास चांगलाच जागा आहे.