पान:गांव-गाडा.pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २४५

कुल गुन्हेगारी नाही, त्याला तुरुंगांत टाकले तरी त्याच्या मनाला काडीइतका धक्का बसत नाही. व्यभिचारी व गुन्हेगार जाती व पंथ ह्यांतील लोकांच्या मनाची स्थिति अशीच असते. त्यांना वाटते की आपला जातधंदा देवानेच आपल्याला लावला आहे, आपले आचरण जातिधर्म, कुलधर्म व संप्रदाय ह्या सर्वांना तंतोतंत धरून आहे, आणि वाडवडिलांचा धंदा आम्ही पुढे चालविला आहे; तो आपण केला नाही तर आपण कुलांगार निपजलों असें होऊन वडिलांचे नांव बुडवून आपल्या बेचाळीस कुळ्या नरकांत घातल्याचे पाप आपणाला लागेल. शाकुन्तलमध्ये धीवर लख्ख उत्तर करतो की-'सहजं किल यद्वीनिन्दितं न खलु तत्कर्म विवर्जनीयम् ' |. जातिधर्माप्रमाणे व्यभिचार किंवा गुन्हे कांहीं दिवस केले नाहीत, आणि जर एखादें आरिष्ट ओढवलें तर आपला धर्म आपण सोडला म्हणून देव व पितर कोपले नसतील ना ? असें व्यभिचारी व गुन्हेगार जातींच्या लोकांच्या मनांत सहाजिकपणे यावयाचे. सरकार भलें कां तुरुंगांत घालीना ! शिक्षेमुळे किंवा रोग भरल्यामुळे त्यांच्या जमातींत तर त्यांची नाचक्की होत नाहीच, पण इतर समाजांतही त्यांना नाळ पडत नाही !! आपल्या घरी चाल बिघडली, किंवा चोरी झाली, सुडी जळाली किंवा जनावर मारले, तर तेवढ्यापुरती इतर जातींच्या पोळलेल्या व्यक्तींच्याच डोळ्यांना काय ती त्यांच्या दुष्कर्माबद्दल टिपे येतात. परंतु असला जातिधर्म समाजविध्वंसक आहे, असे कोणालाही चुकून वाटत नाहीं; मग त्यासाठी कष्टी होण्याचें नांव कशाला ? ह्या जातीकडून दुसऱ्याची आगळीक झाली तर तदितर शिष्टाई करतात की, 'चाललेच आहे, त्यांच्या जातींचें तें कसबच आहे, त्यांनी पोट कशा-

-----

 १ मुंबई पुणे येथे १८९३|४ साली हिंदूमुसलमानांचे दंगे झाल्यावर डोल्यांना भजावयाचे नाही असे काही हिंदूनी ठरविले. परंतु एक दोन वर्षात प्रापंचिक संकटें आली, तेव्हां डोले क्षोभले व त्यांनी आपणांला शासन केले असे त्यांच्या मनाने घेऊन ते पूर्ववत फकीर होऊ लागले, आणि डोल्यांना नवससायास करूं लागले.