पान:गांव-गाडा.pdf/26

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भरित      

 त्यांच्यांत कोणतीही जात संपादते. ” कुणबी, गुजराती ' कणबी ' किंवा माळवी 'किरसान’ हे शब्द संस्कृत कृषी, कृषीवल ह्या शब्दांपासून निघाले असावेत. कोणी म्हणतात, 'कुनमी ' (पृथ्वीला नमन करणारा) ह्या शब्दापासून कुणबी हा शब्द निघाला. द्राविडी भाषेत जमीन कसणाराला पूर्वी " कुल ” म्हणत. कुळव, कुणबी हे शब्द कुल शब्दापासून निघाले असावेत, हें जास्त संभाव्य दिसतें. शेतीचा पर्यायवाचक शब्द कुणबीक, कुणबावा व शेतकरी ह्याचा पर्यायवाचक शब्द " कुणबी ” हें होत. कुणबी हा शब्द वाणी, माळी, भराडी, कोष्टी, कोळी, महार वगैरे शब्दांप्रमाणेंच जातिवाचक असून व्यवसायवाचकही आहे. धर्माकडे किंवा जातीकडे लक्ष न देतां जसे शेतकरी आपआपसांत एकमेकांना 'मिरासभाऊ' 'पास-भाऊ' (पास= कुळवाचा लोखंडी भाग)म्हणतात, तद्वतच शेतीचा धंदा करणारांना ' कुणबी ' म्हणतात. चैत्र गळे कुणबी पळे, कुनबीसरीखा दाता नहि, वगैरे म्हणींत कुणबी याचा अर्थ शेतकरी धरला आहे. खेडें म्हटलें कीं, पांढरीच्या अगोदर चटकन् काळीच डोळ्यासमोर उभी राहते. मेंढके, शेतकरी, गुराखे, पाट, भुङक्या, विहिरी, नांगर, कुळव, मोट, माळा, गोफण वगैरे बळिराजाचें वैभव खेड्याचें नांव काढतांच इतकं मन व्यापून टाकतें कीं, खेड्यांत शेतीखेरीज दुसरा रोजगार चालत असेल किंवा शेतकऱ्यांखेरीज दुसरें कोणी रहात असेल, असें एकाएकीं मनात येत नाही. कुणबी पुढे झाल्यावांचून एकही खेड्यात वसाहत झाली नाहीं. त्यानें धान्य पैदा करून इतरांच्या खाण्याची तरतूद केली, तेव्हां ते गोळा झाले. दुनियेच्या पोटापाण्याचा भार कुणब्यानें उचलला ही सार्वत्रिक समजूत असल्यामुळे खेड्यांतले सर्व धंदेवाले कुणब्याला "बळिराजा ” असें संबोधितात. वामनाला पृथ्वी दान करणारा बली राजा होता, ही पुराणकथा लोकप्रसिद्ध आहे. शेतीच्या धंद्याइतका शारीर बल वाढविणारा दुसरा धंदा नाही; व रामोशी, महार, मांग इत्यादि सर्व जाती एकवाणींंनें कबूल करतात कीं, एकदरींत कुणब्यां