पान:गांव-गाडा.pdf/259

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३८      गांव-गाडा.

असोत कां कमी होवोत, त्या वधघटीचा फायदा एकंदर जनतेला मुळीच मिळाला नाही.

 आपल्या समाजांत रूढीचे प्राबल्य फार असल्यामुळे एखाद्या धंद्याची उपयुक्तता वाढली तरी त्याचा व तो करणारांचा दर्जा व प्रतिष्ठा वाढण्यास मारामार पडते. वतनदारांच्या ओळींप्रमाणे जातिधर्मानें निरनिराळ्या धंद्यांच्या किंवा त्यांतील पोटधंद्यांच्या प्रती लावल्या आहेत. त्यामुळे जातींना व धंद्यांना कृत्रिम महत्त्व आले, आणि देशकालमानाने अव्वलच्या प्रतिष्ठित धंद्यांची उपयुक्तता हटली तरी लोकांचा ओघ उपयुक्त धंद्यांपेक्षां प्रतिष्ठित धंद्यांकडे जास्त वळतो. आमच्यांत ब्राह्मणी धंदे, विशेषतः उपाध्यायपण व कारकुनी, मानाई गणले आहेत. ग्रामजोशी हा तिसऱ्या ओळीचा बलुतदार असून त्याला लोहार-चांभारांपेक्षां उत्पन्न कमी मिळते. ही स्थिति डोळ्यांनी पहात असतांही उपाध्यायपण पटकावण्याकडे जितका ब्राह्मणेतरांचा ओढा दिसतो, तितका जास्त उपयुक्त व किफायतशीर पण कमी प्रतिष्ठित गणलेल्या हुन्नरांकडे दिसत नाही. सुतार, गवंड्याला १-१|.रोज पडतो; आणि त्यांची हजरी टिपणाऱ्या कारकुनांना σ४-σ५आणे रोज पडतो. तरी कारकुनी मिळविण्यास ब्राह्मण जितके आतुर दिसतात, तितके सुतार गवंडी कामाला दिसत नाहीत. शारीरिक दौर्बल्य हेही ह्याचे कारण असेल, पण तें मुख्य खास नाही. विहिरी बांधण्यांत कुशल म्हणून ४००-५०० रुपये साल पाडणाऱ्या एका महाराचा ख्रिस्ती धर्म स्विकारलेला मुलगा ६-७ रुपयांच्या मास्तरकीवर खूष दिसला. कारण मास्तरचा मान गवंड्याला नाही. एका काळी अप्रतिष्ठित मानलेल्या धंद्यांची उपयुक्तता व पैदास वाढली असूनही ते धंदे करणारांची समाजांत निष्कारण मानखंडना होतें; त्यामुळे सध्यां सदर धंदे करणाऱ्या व प्रतिष्ठित पण कुचकामाचे धंद करणाऱ्या जाती ह्यांच्यामध्ये विनाकारण जळफळाट वाढतो, आणि प्रतिष्ठित धंद्यांत दाटी व उपयुक्त धंद्यांत पैस, अशी स्थिति उत्पन्न होऊन एकंदर समाजाचें सांपत्तिक व बौद्धिक नुकसान होत आहे.