पान:गांव-गाडा.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २३१

लेल्या जातींची 'घाऱ्याला बोळा व दरवाजा मोकळा ' अशी स्थिति झाली. प्रत्येक जात, पोटजात व पंथ इतर जातींशी व्यवहार आंखडीत व बंद करीत जाऊन आपापली घारी झांकण्यांत गर्क झाले; पण सार्वजनिक दरवाजा मोकळा पडून त्याचा बंदोबस्त कोणालाही करतां आला नाही. स्वसमाजस्थैर्यासाठी इतर जातींशी फटकून राहण्याची जी चाल जातिभेद निर्माण करणारांनी धर्माच्या नांवावर पाडली ती हिंदुधर्म व त्यांतून निघालेले दुसरे आचारप्रधान धर्म ह्यांच्या अनुयायांच्या मुळावर आली. जी ती जात किंवा पोटजात आपापल्यापुरते पाहूं लागली. समाजाचे लहान लहान तुकडे पडून कालांतराने परस्परांचे संघट्टन जसजसें कमी होत गेले, तसतसे ते एकमेकांना दूर धरूं लागले; इतकेंच नव्हे तर दुसऱ्याचे काही झाले तरी माझें तात्पुरतें काम भागले म्हणजे बस्स, असा वीट येण्यासारखा आपपर भिन्नभाव सर्वत्र वाढत गेला. कातडी रंगवितांना घाण सुटते. ती रंगविण्याचे जागेबद्दल ढोर, चांभार व इतर जाती ह्यांच्या तक्रारी नेहमी चालूं असतात. हीच स्थिति कुंभार, लोणारी, परीट ह्यांच्या धंद्यासंबंधाने दृष्टीस पडते. मांग लोक केकताडाचा वाख करतात. त्यासाठी ते पाण्यात भिजू घालून सडवावें लागते. ते पाण्यात भिजू घातलें म्हणजे पाणी नासून त्याला दुर्गंधी येते, आणि असे ऐकिवांत आहे की जर ते विहिरीसारख्या कोंडपाण्यांत भिजत घातले तर तसलें पाणी पोटांत गेल्याने जनावरें दगावतात. लांब कोण जातो म्हणून मांग बेधडक एखाद्या कुणब्याच्या विहिरीत किवा पाणोथ्याला केकताड भिजूं घालतात. जीवदान देण्यांत हिंदू व जैन पुण्य मानतात आणि तत्प्रीत्यर्थ शक्त्यनुसार पैसा खर्चितात, म्हणून फांसपारधी पाखरे धरून आणून मुद्दाम हिंदू-जैनांकडे नेतात व आठ चार आणे उपटून ती सोडून देतात. सर्व जातींचे लोक मुद्दाम गबर जैन

-----

 १-चोपडें येथे श्रीमंत व्यापारी आहेत. सन १९०७ साली त्यांच्या उपवासाचे दहा दिवसांत गावांत हत्त्या होऊ नये, म्हणून त्यांनी हिंदु धीवरांना पंचवीस रुपये आणि मुसलमान खाटकांना सातशें रुपये दिले. १९०८ सालीं खाटकांनी सदरहू दिवसांत जनावरें न मारण्यासाठी सदरहू लोकांजवळ हजार रुपये मागितले !!