पान:गांव-गाडा.pdf/251

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३०      गांव-गाडा.


तेव्हां असा प्रश्न उद्भवतो की, आधी कोण? ही दैवतें कां मुजावर ? मुर्दाड मांस न खाण्याचे कारण मलीक (पीर ) तसे करूं देत नाही असें मांसाहारी हिंदू सांगतात; आणि पीर क्षोभतो म्हणून मुलान्याकडून जनावर हलाल न करवितां स्वतःच तें मारून खाणाऱ्या फांसपारध्यांसारख्या जातींना इतर लोक पांढरीत राहू देत नाहीत. हलक्या जातींच्या बहुतेक हिंदूंच्या देव्हाऱ्यांत पिराचे ठाणे आहे. भडोच, शहागड, उद्धपूर वगैरे पंच पिरांना मानभाव कुलस्वामी समजतात. गांवीं फकीर नसला तर हिंदू वर्गणीने परगांवचा फकीर आणून ताबूत करतात, व मोहरमांत फकीर होतात. ताबुतांला नवस करून त्यांच्याखाली पोरांचे नाक कान टोचणारे हिंदू वरिष्ठ जातींत सुद्धा आहेत. अशा वेळी सोनारांची नाहक्क पोळी पिकते. पिराला किंवा दर्ग्याला लोटांगण घालतांना मुसलमान दृष्टीस पडत नाही; परंतु दुखण्यांतून उठले म्हणजे हिंदू लांबवर पिराला दंडवत घेत जातात; व लग्नकार्य झाले म्हणजे ब्राह्मणांबरोबर फकिरांना दक्षिणा शिधा देतात, आणि पिराला ओहर-यात्रा करतात. (दंपत्यें वाजत गाजत जाऊन नैवेद्य करतात.) सर्व जाती पिराला मलिंदा ( नैवेद्य ) नेतात, व मुजावराचा त्यावर फात्या घेतात. काही ठिकाणी ब्राह्मण कुटुंबें सुद्धा दावलमलिकाला हांजल निघून काळें फडकें गुंडाळून हातांत फावडी घेऊन दोम दोम करीत घरोघर झोळी फिरवितात. ताबूत आणि पिरांचे नवस ह्या प्रसंगी सर्व जातींचे हिंदू फकीर जेवूं घालतात. हिंदु लोक देवाला नवसाने गाई, पोळ सोडतात; आणि त्यांनी शेतात किंवा बाजारांत कशांतही तोंड घातलें तरी त्यांना कोणी वारीत नाही. बकरी पिकांना फार अपाय करतात, त्याच्या तोंडचा ठोम म्हणून फुटत नाही. पिराच्या देव्हाऱ्याला हिंदूनी डोके लवविल्यापासून पोळांच्या जोडीला पिराचे बोकड मिळाले, आणि दोघेही बाजारांत व शिवारांत धुमाकूळ घालतात. वांद्र्याच्या खिस्तमातेला ख्रिस्ती लोक बहुधा नवस करीत नसावेत, परंतु हिंदूंचे मात्र येथें नारळ फुटतात. सारांश, सर्व व्यवहारांत एकमेकांतून बहुतांशी फुटुन निघा-