पान:गांव-गाडा.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.      २२९

माघार घ्यावी लागते. श्रमसहिष्णु जातींनी जर ह्यांचे किरकोळ साधे पण आंगमेहनतीचे काम टाकले तर ह्यांची मोठीच अडवणूक होते व होणार. खेड्यांतल्या कणखर जातींचे लोक मामळभटाच्या शरीरदौर्बल्याचे सोंग मोठ्या गमतीचे व बोधप्रद आणतात, आणि वर्णनहीं रसभरित करतात. शेत असून नांगर धरण्याची संवय नसल्यामुळे ब्राह्मणाला शेतीचे उत्पन्न भरपूर मिळत नाही. व्यापारी सद्गुणांचा त्यांच्याठायी लोप झाल्याने मारवाडी गुजराती त्यांना पातीत घेत नाहीत. मराठा व मुसलमान ह्यांखेरीज इतर दक्षिणी हिंदु जातींना सरकार पलटणीत नुसतें खोकू देत नाही. कारण त्यांतले लष्करी गुण झडून गेले आहेत. गुजरात खानदेशाकडे सावकार लोक गाय-तोंड्या हिंदूंपेक्षा अवसानबाज मुसलमान तगाद्याच्या कामासाठी जास्त पसंत करतात. चिकाटीच्या व धाकदडपीच्या धंद्यांत हिंदूपेक्षां मुसलमान व पार्शी अधिक यश संपादितात. ताशेवाले, गाडीवान, आतार, दरवेशी, बहुतेक मुसलमान आहेत. गायकसाई सर्व मुसलमान आहेत. वड्डर, कोल्हाटी, कैकाडी, भामटे वगैरे हिदु जाती डुकरें पाळतात, पण जातिधर्मामुळे त्यांचे मांस विकण्याचा किफायतशीर धंदा ख्रिस्ती लोकांच्या हातांत गेला आहे.

 हिंदुसमाजाचा अष्टपैलूपणा नाहीसा होऊन तो ऐहिक व्यवहारांत पाहुणा झाला, इतकेच नव्हे तर धार्मिक बाबतींतही तो पराधीन झाला आहे. आले वेडसर पाहुणे । ते तो जगाचे मेहुणे ॥ ह्या श्रीसमर्थउक्तीप्रमाणे जो उठला तो हिंदूनाच दोन गचांड्या देत सुटला, व तेही मागासलेल्या जातींतल्या मेहण्याप्रमाणे त्या सोशीत राहिले. हा दोष त्यांच्या युक्तायुक्तविवेकशून्यतेचा व धर्मभोळेपणाचा आहे. हिंदूच्या धर्मकृत्यांवर महमदीयांनी चदविलेले हक्क,आणि नाथ, अगाखानी, सुफी इत्यादि पंथ, उच्चरवाने सांगतात की धर्मातसुद्धां हिंदूंना स्वतःचे म्हणून काही निर्भेळ उरले नाही. हिंदू दैवतांना ( देवी, खंडोबा, बहिरोबा, जोतीबा) कंदोरी करावयाची असते. पण तत्प्रीत्यर्थ बकरें मारण्याला व त्याला फात्या देण्याला बहुतेक सर्व हिंदू जातींना मुसलमान मुजावर लागतो.