पान:गांव-गाडा.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
गांव-गाडा.

असावा. दौंडीचा मजकूर तोंडाने ओरडून महार सांगतो व डफडें मांग वाजवितो. प्रेताचें सरण महार वहातो आणि तिरडी बांधण्याची दोरी मांग पुरवितो. पड्याचे अमुक एक (आणि ते महत्वाचे असतात ) अवयव महारांनी घ्यावेत, अमुक मांगांनी घ्यावेत, असे हक्क असल्याबद्दलच्या झालेल्या मजलसींचे जुने कागदपत्र दृष्टीस पडतात. महारांच्या घरी लग्न निघाले तर मांगांनी खिजमत करावी. मांगानें लग्न केलें तर शेला-लुगडे, आणि गोंधळ जागरण घातले तर चार पैसे, महाराला द्यावेत. मांग मोळ कापावयाला गेला तर त्याने महारास चार पैसे, खोबरें, पानसुपारी इतके दिले पाहिजे. महारान बैलावर व मांगानें हल्यावर वरात काढावी. अशा प्रकारच्या दस्तरांवरून मूळ महार, आणि मांग ही महारातून वेगळी पडलेली पोटजात असावी किंवा ती त्याचेमागून त्याच्या पडोशाला येऊन राहिली असावी, असें अनुमान निघते. असो. जातिपरत्वं निरनिराळे पाणोथे आहेत इतक्या मुबलक पाण्याचा गाव विरळ. परंतु कितीही अडचण असली तरी ढोबळ मानाने स्पृश्य जाती एका पाणोथ्याला जातात, व त्यावर अस्पृश्य जातींना पाणी भरूं देत नाहीत. दुसरा पाणोथा नसल्यास स्पृश्य जाती अस्पृश्य जातीना पाणी काढून वाढतात. सवड असल्यास निरनिराळ्या जाती उच्चनीच भावानुरोधाने वेगवेगळ्या पाणोथ्यांवर पाणी भरतात, जसे, महाराच्या पाणोथ्यावर चांभार पाणी भरीत नाहीत: अथवा मांगांच्या पाणोथ्यावर महार पाणी भरीत नाहीत.

 काळी व पांढरी हे जसे गांवाचे दोन स्वाभाविक विभाग पडतात, तसे उद्योगपरत्वें लोकवस्तीचे दोन भाग शेतकरी करतात- “ कुणबी" म्हणजे शेतकरी आणि “ अडाणी" म्हणजे बिगर-शेतकरी. सह्याद्रीच्या पायथ्याशी डांगाणांत महादेवाचे कोळी राहतात. तेथील एका गांवचा एक पोक्त कोळी बोलतां बोलतां आढ्यतेने म्हणाला की "आमी 'राजकोळी,' कुणबी नव्हत. 'कुणबी' म्हणजे 'कोणीबी' ( कोणीही ).