पान:गांव-गाडा.pdf/249

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारासार.
-----------

 विवेकें क्रिया आपुली पालटावी । अती आदरें शुद्ध क्रीया धरावी ||रामदास.

 वर्णाश्रमधर्म, जातिधर्म व वतन ही परंपरा आहे. वर्णाश्रमधर्मव्यवस्थेत व्यवसाय जन्मसिद्ध झाले, आणि तदितर व्यवसाय करण्याला लोक अधर्म मानूं लागले. वर्णाश्रम आतां नांवाला आहे, असे म्हटले तरी चालेल. व्यवसायांत बारीक बारीक पोटभेद पडून ते संकीर्णवर्ण, जाती, पोटजाती व आर्येतर जमाती ह्यांच्या गळ्यांत पडत गेले; आणि वर्णाश्रम-धर्माची सहस्रावधि शकलें जाति-धर्माच्या रूपाने दृष्टीस पडू लागली. ह्याप्रमाणे समाज अतिशय विभागला जाऊन, जो तो विभाग आपापल्या तोऱ्यांत राहून अमर्याद एककल्ली व एकधोरणी बनला. ह्याचा ढोबळ परिणाम असा झाला आहे की, हिंदु समाजाचा अष्टपैलूपणा गेला, आणि आत्मसंरक्षणाच्या कामीं तो लुला पडून त्याची स्वयंपूर्णता नष्ट झाली. आपला विशिष्ट व्यवसाय खेरीज करून बाकीच्या धंद्यास काही कांहीं जाती अजिबात आंचवल्या, आणि एकंदर हिंदु समाज काही धंद्यांना पूर्णपणे मुकून तो दररोजच्या व्यवहारांत देखील परधर्मीयांच्या कह्यांत गेला आहे. जो समाज हरहुन्नरी नाही, किंवा वेळ पडेल त्याप्रमाणे धंदा करण्याची ज्यांत सवड ठेविली नाहीं तो मृत-प्राय हीन दीन अवस्थेप्रत कधींना कधी पोंचलाच पाहिजे. ब्राह्मण तलवारीची परवा करीतनासे झाले, आणि क्षत्रिय तागडीला तुच्छ मानूं लागले. ऐटीत आल्यावर अजून सुद्धा मराठ-बिंडा म्हणतो पोकळ धोत्र्या ब्राह्मणाच्या लेखणीला किंवा ढेरपोट्या वाण्याच्या तागडीला कोण हाती धरतो ? आणि ब्राह्मण म्हणतो लेखणीपुढें तलवारीची काय मातब्बरी ? सर्व साक्षर व कलासंपन्न जातींत राकटपणा नाहींसारखा झाला आहे. शारीरिक श्रम पाहिजेत अशा सर्व धंद्यांत ह्या जातींना