पान:गांव-गाडा.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२२      गांव-गाडा.


सर्व वाणगीवारी व शेरणीवारी खपते. एखाद्याला कां पुरे दिले नाहीं की तो दंश धरतो, आणि तो हलक्या वर्गातला असला तर तें चोरून नेतो. ह्या फुकटाफुकटीचा परिणाम रास्त कामावर होत गेला. गिऱ्हाइकानें काम करून घ्यावें, काम करणारानें वेतनासाठी हेलपाटे घालावेत आणि कसब्याने चाळवाचाळवी व कुचराई करावी, असले दुर्गुण (ह्याला गांवगुंडकी कसब म्हणतात.) सर्वांमध्ये पांगले. येतां येतां हक्काला भिडे व भिकेचे स्वरूप आले. मला अमुक गुण येतो, व त्याचा मोबदला अमुक घेईन, असें गुणीजन म्हणत नाहीत; आणि आपणांला काय द्यावें लागणार ह्याची कल्पना उपभोक्त्यासस नसते. वैद्याने औषध द्यावे आणि संभावना काय होते ह्याची चिंता करीत बसावें. मालकापुढे हजरी द्यावयाची तुम्ही शिरपाव द्या किंवा नका देऊ असें म्हणून गोपाळकोल्हाटी खेळ करतात, आणि ऐपतीप्रमाणे काही दिले तरी खूष होत नाहीत. बरे, त्यांची जिवावरची कामे पाहावयाला शेंकडों जमतात, पण थाळी फिरण्याची वेळ आली की गर्दी ओसरते; आणि खेळकरी ओरडतो की जाईल त्याचे तोंड काळें. रोख पैसे देऊन आपली गरज किंवा हौस परविण्याचा सराव खेड्यांत अजिबात मोडल्यासारखा झाला आहे. निदान कामाच्या मानाने रास्त पैसे देणारे घेणारे लोक क्वचित् दिसतात. या सार्वजनिक खोडीमुळे काम नासते, कारागिरांच्या गुणांचें चीज होत नाही, व उघड हिशेबाने होणारे दाम मालकाच्या हातून सुटत नाहीत. म्हणून कामगारांत टंगळमंगळ व चोरटावा माजून राहिला आहे, आणि देवगण अकलेत मोडूं लागले आहेत. कामाचे किंवा सौद्याचे अगोदर आणि नंतर जी चहूंकडे ओढाताण घासाघीस चालते, तिचे कारण 'रोख भाई ठोक' ह्या व्यवहाराला आम्ही फार दिवसांपासून पारखे झालों हे होय.

 येथवर आपण गांवगाड्याच्या समाईक हितासंबंधानें वतनपद्धतीचा

-----

 १-प्रवरा कालव्याच्या किनाऱ्याच्या एका गांवीं एका जागल्याला चोरून घोसाळी काढतांना मळेकऱ्यानें पाहिले. मळेकरी रागावून बोलला आणि दुसरे दिवशी पाहतो तो वेल खुडलेले !