पान:गांव-गाडा.pdf/242

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २२१

सुतार, लोहार, चांभार ह्यांच्यासंबंधाने असते. पैसा अगर धान्य देऊन आपले पसंतीच्या कारूनारूंकडून काम घेण्याची असाम्यांना मुभा न ठेवल्यामुळे कारूनारू कसबांत कमी पडूं लागले व शिरजोरही झाले.

 वतनपद्धतीमुळे एक अति मोठा समाजविघातक अवगुण आमच्यांत शिरला; तिने सर्वाला अरेरावी, भिक्षुकी आणि चोर चाळे शिकविले. तिचा अंमल जारी असता तर आगगाडीची तिकिटें वर्षानुवर्ष खपली नसती, आणि वतनदार व त्यांचा माल फुकट न्यावा लागता; आणि इंग्रज सरकार ज्याप्रमाणे दुष्काळांत चाऱ्याच्या वाहतुकीबद्दल भाडे भरपै करतें तसे काहीं एक लाभलें नसते. घोडे, गाडी पाहिजे असली की, ज्याजवळ गांवांत असेल त्याला त्याचे ग्रामबंधु तगादा लावतात. तुळशी, फुलें, केळीची पाने हवीं असली की, ज्याजवळ ती असतील त्याकडे मागतात, व त्यांनी दिली नाहीत म्हणजे रागावतात आणि वड्याचे तेल वांग्यावर काढतात. मागणे नको आणि रागावणे नको म्हणून काही लोक हौसेच्या जिनसा जवळ बाळगीत नाहीत किंवा नामांकित उदीम करीत नाहीत. गुऱ्हाळघरची हकीकत मागे आलीच आहे. फळफळावळांपासून तों लोणकढे तुपापर्यंत वाणगी मिळावी अशी इच्छा सार्वत्रिक असते. खेड्यांतले श्रीमंत सुद्धा विचारतात की, तुमच्याकडे आंबे, शेंगा, कोबी झाली पण आमच्याकडे वानवळा आला नाही. एकटे दुकटे कुणबी किफायतशीर पीक करीत नाहीत तें एवढ्यासाठी की, एकट्याने केलें म्हणजे तें

-----

 १ एका कुळकर्णी वतनदार मामलेदारांनी आपल्या घराचे सुतारकाम गांवच्या सुताराला दिले. त्याने सागवान गैरहिशेबी कापले, तेव्हां कळून आले की हा रद्दी कारागीर आहे. म्हणून त्याला रजा देऊन दुसरा सुतार पाहूं लागले. तो बारा कोसांत कोणीही काम घेण्याला धजेना ! तालुक्याच्या ठाण्यांत देखील एका परटाकडे धुणे जाऊ लागले आणि नंतर त्याने कपडे फाडले, चोरले, अगर त्यापेक्षा दुसरा काम चांगले करतो असें कळून आले तरी पहिल्याला काढून दुसऱ्याला लावतां येत नाही, व दुसराही अदावतीच्या भीतीने पहिल्याचे काम धरीत नाही !! हा अनुभव पुष्कळ उपऱ्या नोकरांना असेल.