पान:गांव-गाडा.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२०      गांव-गाडा.

त्यांना ह्या जिनसा फुकट मिळत असल्यामुळे त्यांजवळन त्या व्यापारी जाती हलक्या दराने घेतात. तेच व्यापारी त्या भारी दराने चांभाराला विकतात. ह्यामुळे चांभारकाम फार महाग पडूं लागले आहे. काही दिवसांपूर्वी कुणबाऊ जोड्याला आठ आणे तें सवा रुपाया पडे; त्याला आता दोन ते तीन रुपये पडतात. मोटेची किंमत साडेपांच रुपयांपासून १५-२० रुपयांपर्यंत चढली आहे. तात्पर्य, ह्या बाबतीत कुणब्याला महार बुडवितात व महारांला व्यापारी, मिळून कुणब्याची दुहेरी बुडवणूक होते.

 वतनपद्धति जशी महाग आहे तशी ती एक प्रकारची जुलमाचीही आहे. दुर्जन पतीशी संसार करतांना बायका म्हणतात की, जसा पूर्वजन्मी शंकर पुजला असेल तसा मिळाला. असाम्यांनाही असें म्हणण्याची पाळी येते की, जसे पूर्वजन्मीं कारू पूजले असतील तसे लाभले. पाटीलकुळकर्णी कितीही उपद्व्यापी व रयतेची बाजू मांडण्यास बेवकूब असले, तरी कायद्याने वजा होईपर्यंत ते कशी तरी गांवे करतात. गांवभट ठोंब्या असला, तरी दुसऱ्या जाणत्या ब्राह्मणाला बोलावून त्याला दक्षिणा देऊन खेरीज गांवभटाचा हक्क द्यावा लागतो. गांवचे महारजागले कितीही कुचर, चोरटे, गुरें-मारे असले तरी ते गांवकामगारांना व रयतेला चुकत नाहीत. कारूनारू कितीही अडाणी असले तरी त्यांच्या असाम्यांनी त्यांच्याच हातून काम घेतले पाहिजे. ते त्यांच्या भाऊबंदाकडून सुद्धां घेतां कामा नये. हा जुलूम नव्हे तर काय ? खंडू वारिकाची असामी जयवंतराव पाटील आहेत. खंडूजवळ हत्यारे तर नीट नाहीतच, पण त्याचा हातही जड आहे. पाटील दर खेपेला कातवतात, त्यांची लेकरें खंडबा पाहिले की पळतात व हजामतीचे वेळी रडतात. खंडूचा भाऊ पांडू जरी चांगला कारागीर असला तरी पाटलाला खंडूला नको म्हणून पांडूला बोलावतां येत नाही. हीच स्थिति