पान:गांव-गाडा.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २१९

उलट सरसकट हिशेब जुळविला तर अधिकच पडते अशी खात्री होईल. पण मोबदला मात्र कारूनारूंकडून अगदीं खोटा व महागाचा मिळतो. त्यांना सध्या जी प्राप्ति होते ती त्यांच्या अकलेच्या, उद्योगाच्या मानाने बरीच अधिक आहे. ह्याला प्रत्यंतर, हक्क सोडून रोखीने काम करण्याला एकही वतनदार कबूल नाही. लोहार, सुतार, चांभार, न्हावी वगैरे बलुतें सोडण्याला नाकबूल आहेत. त्याचप्रमाणे पाटीलकुलकर्णी (दुमाला गांवचे) व महार जागले. दुष्काळापासून कुणबी खरकला तो सांवरत नाही. कारूनारुंची स्थिति कुणब्यापेक्षां पुष्कळ बरी आहे, इतकेच नव्हे तर त्यांपैकी कित्येकजण सावकारी करून आहेत. सावकारांना विचारतां पाटीलकुळकर्ण्यांंशिवाय कारूनारू क्वचित् कर्जबाजारी आहेत असे समजते. दुष्काळांत सुद्धा कुणब्याइतकी त्यांची गाळण झाली नाही. दिसतांना आपल्याला , महारांची इतकी केविलवाणी स्थिति दिसतेना ? पण एकंदरीत कुणब्यापेक्षां ते पुष्कळ हात राखून आहेत. सन १९०५-०६, १९११-१२ सालच्या दुष्काळांत सरकारी जंगलांतलें गवत कापण्याला माणूस मिळेना; व महारमांग कांहीं केल्या गांव सोडून तिकड़े जाईनात. पूर्वी एंजिनियर खात्याकडे, महारमांग कामकऱ्यांची गर्दी असे. आतां त्या खात्याच्या कारकुनांना गांठचा विसार देऊन महारवाड्यांत जोडे फाडावे लागतात तरी पुरेसे रोजंदार मिळत नाहीत. जनावरांच्या हाडकाकातड्याला किंमत आल्यापासून महार गांवोगांव सुधारलेले दिसतात. ढोरामागे हाडकें चरबी व कातडे ह्यांचे सरासरी वीस पंचवीस रुपये येतात. तरी त्यांना वास्तविक मिळावा तितका नफा मिळत नाहीं; कारण हाडकें, कातडी, तरवडाची साल ह्यांचा पेठेचा बाजारभाव त्यांना माहीत नसतो. ज्याप्रमाणे रस पिणारा पिऊन जातो आणि चरकाचे तोंड देखील पुरते माखत नाही, त्याप्रमाणे त्यांची गत झाली आहे.

-----

 १ पनवेलच्या महारांनी अजमासें १०० रुपये सालाप्रमाणे हाडकाकातड्यांचा हक्क मिस्तर याकुबभाई नांवाच्या गृहस्थास दिला आहे. महार वर्षानुवर्ष त्यांस हाडके कातडी देतात, आणि भाईसाहेब लक्षाधीश झाले आहेत असें ऐकतों!