पान:गांव-गाडा.pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
      गांव-गाडा.


मेलेल्या जनावरांची चिरफाड करणा-या (शस्त्राने न मारलेल्या म्हणजे निसर्गधर्मानें मेलेल्या जनावराला “ पडे" म्हणतात; त्यांच्या मांसाला तें न खाणाऱ्या जाती “ माती" म्हणतात, व तें खाणाऱ्या जाती "भाजी" म्हणतात.) व ती खाणाऱ्या जातींची, तसेंच वंजारे, वड्डर, कैकाडी, फांसपारधी वगैरेसारख्या फिरस्त्या व नवीन वस्तीला आलेल्या जंगली जातींची घरे, पालें किंवा झोपड्या प्रायः गांवाबाहेर असतात. त्यांतले त्यात फासपारध्यांच्या झोपड्या गावापासून जरा दूर असतात. ह्यामुळे पांढरी पांगलेली दिसते इतकेच नव्हे तर नवख्याला जवळ जवळ दोन तीन गावें असल्याचा भास होतो. जातीजातींची घरें सलग असतात व त्यांना जातिपरत्वं माळआळी.सुतारआळी, कोळवाडा, रामोसवाडा, भिलाटी अशी नावं पडतात. दर एक गांवाला एखादें देवालय आणि बहुतेक गांवांला चावडी असते. तेथे लोक जमतात. भिल्ल, कोळी, रामोशी वगैरे तुफानी जातींतले लोक जंगल पहाडाचे दडण व पुंडावा सोडून गांवाच्या आश्रयाला आले, तेव्हां त्यांच्या जातिधर्मास योग्य अशा ठिकाणी त्यांना वस्ती मिळाली. ह्या जाती स्पृश्य आहेत तरी त्यांना मध्यवस्तीत कोठेही जागा मिळाली नाही. वहिमी जाती मध्यवस्तीत ठेवणे धोक्याचे असते. त्यापेक्षा त्या वेशीजवळ किंवा गांवकुसाजवळ राहिल्या तर गांवाचें राखण तरी करतील. म्हणून भीलवण, कोळवणांतील गांवें शिवाय करून इतर मुलखांतल्या गांवांत ह्या जातीची वस्ती वेशीजवळ किंवा गांवकुसाजवळ दिसून येते. अस्पृश्य जातीपकी ज्या गोमांस खात नाहीत. अशा ढोर, चांभार, भंगी, इत्यादींची घरं गांवांत शेवटी किंवा गांवकुसाबाहेर अगदी गांवाला खेटून असतात. महार, मांग, मेलेली ढोरें ( गाई, म्हशी ) फाडतात व खातात म्हणून महारवाडा व मांगवाडा हे गांवापासून किंचित् दूर असतात. पश्चिमेची शुद्ध हवा मिळावी ह्यास्तव पुष्कळ ठिकाणी ते गांवाच्या पूर्वेस आढळतात.

-----

१ चांभारगोंदें ऊर्फ श्रीगोंदें येथे मात्र चांभारवाडा गांवाच्या मध्यवस्तीत आहे.