पान:गांव-गाडा.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८      गांव-गाडा.

नको. 'गोमा गणेश पितळी दरवाजा' हा मार्ग आमच्या स्वराज्याप्रमाणे स्वधर्मालाही लागू पडतो. करामत लढवील त्या 'नराला' आम्ही तेव्हांच 'नारायण' करतो. नखाला माती न लागू देतां देवाच्या नांवावर षोडशोपचार भोगण्याचा धंदा म्हटला म्हणजे तो उपाध्येपणाचा होय; ही गोष्ट सर्व जातींच्या गळी उतरली, आणि हिकमती ब्राह्मणेतरांनी निरनिराळ्या देवतांचे व भक्तांचें स्तोम माजवून उपाध्यायपण पटकविण्याला आरंभ केला. कालांतराने त्यांचे निरनिराळे संप्रदाय ठरून अमुक देवाची अर्चाही अमुक जातीने अगर पंथाने करावी अशी वहिवाट पडली. शिवाची पूजा गुरव, गोसावी, जंगम ह्यांनी; विष्णु, हनुमानाची पूजा बैराग्यांनीं; देवीची पूजा भुत्ये, आराधी, गोंधळी, हिजडे ह्यांनीं; बहिरवाची भराडी, कुणबी, माळी ह्यांनीं; खंडोबाची वाघ्यामुरळ्यांनी; मरेआईची महारामांगांनीं; कृष्णाची मानभवांनीं; कान्होबाची मुसलमानांनी कमाविली. राशीनच्या देवीच्या देवळांत देवीपर्यंत मुसलमान जहागिरदार जातात, आपल्या हाताने प्रसाद अंगारा देतात व देवळांत आपला हक्क उगवतात. पिरासंबंधाने ब्राह्मणापासून तो यच्चयावत् सर्व हिंदूचे उपाध्यपण मुसलमानांनी पटकाविले. हिदु हिजड्यांचा मागता मुसलमान मुंढ्या आणि हिजडे व कसबिणींचा गुरु सवागी (सौभाग्य देणारा) फकीर झाला. (सवागी फकीर आपले स्वतःच्या हातांत हिरव्या बांगड्या भरतात आणि यच्चयावत् कसबिणींकडून दर पलंगामागे कमीत कमी सवा रुपया दक्षिणा घेतात.) आमच्यांतल्या तेहतीस कोटी देवांची व अगणित साधूंच्या समाधींची पूजा सर्वत्र ब्राह्मण किंवा वर वर्णन केलेल्या वर्गाकडेच आहे असा प्रकार नाही. स्थानपरत्वे ती ब्राह्मणांपासून तो भिल्ल, कोळी, रामोशी, महार मांग मानभाव, मुसलमान यांचेकडेही आहे. या स्थाईक उपाध्यायांशिवाय तिरमल, पांगूळ, वासुदेव, कानफाटे, सुपहलवे, गोसावी, बैरागी, मानभव, फकीर वगैरे फिरस्ते उपाध्याय व भिक्षुक निराळे. सारांश, असा एकही धर्म किंवा ज्ञाति नाहीं की जी हिंदूंच्या उपाध्येपणांत व भिक्षुकात घुसली नाही. दरएक जातीचे भिक्षुक प्राचीन काळापासून वंशपरंपरेचे