पान:गांव-गाडा.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २०३

पडला त्याबरहुकूम ते तें चापून घेतात; आणि आपले काम वेळेवर किंवा चांगले होण्यासाठी कुणब्यांना आपल्या असामीदारांखेरीज गांवच्या किंवा बिछाइती कारागिरांना धान्य अगर पैसे द्यावे लागतात. मुख्य मुद्दा असा आहे की, पूर्वग्रहविरहित मनाने विचार केला तर असें कबूल करणे भाग आहे की, जातधंद्यावर उभारलेल्या वतनपद्धतींत दामाची, कामाची आणि जबाबदारीची वाटणी, समतोल झाली नाही, आणि कधी काळी झाली असल्यास ती गांवगाड्यांत तशी राहिली नाही. तिचें पारडे केव्हांच झुकलें आणि म्हणून खेड्यांतील बहुजनसमाज जो कुणबी त्याला नाहक्क बुडावे लागते.

 वतनपद्धतीने वतनदारांची मूळ कामें व हक्क त्यांच्याकडे अव्याहत सर्वांशी चालू राहिले असते तरी म्हटले असते की, 'ताटांत सांडलें काय आणि वाटीत सांडलें काय एकच.' पण तसेंही झाले नाही. समाईक जबाबदारीची समतोल वाटणी न झाल्यामुळे 'बाराभाईंच्या खेती'प्रमाणे वतनदारांची दक्षता कमी होऊन ते स्वहितालासुद्धा पुरते जागले नाहीत. गांवगाड्याचा उपाध्याय ग्रामजोशी व तो ब्राह्मण असतो. सर्व शास्त्रांचे अध्ययन, अध्यापन करण्याचा ब्राह्मणधर्म असल्यामुळे ब्राह्मण सरस्वतीचे कट्टे उपासक झाले. लोक त्यांना प्रतिभूदेव मानीत असल्यामुळे स्वतःचे ज्ञान आणि समाजाचा पाठिंबा ह्यांच्या जोरावर बाकीच्या जातीप्रमाणे ते बहुशा अक्षरशत्रु राहिले नाहीत. तेव्हां शिक्षणाने येणाऱ्या ज्ञानामुळे त्यांनी आपली उपाध्यायवृत्ति अछेद्य ठेवण्याला आणि तिची किफायत दुसऱ्या जातींच्या घरांत जाऊ न देण्याला कांहीं हरकत नव्हती. परंतु त्यांच्या हातून असे झाले आहे काय ? पाश्चात्यज्ञानरवीच्या प्रकाशाने पाऊलवाट दिसूं लागून जातिजातींत नवीन निर्माण होणारे आधुनिक उपाध्याय वगळले तरी प्रत्येक जातीने व धर्माने ब्राह्मणाच्या वृत्तीचे मागेच तुकडे करून ते आपण तोंडात टाकल्याचे दिसून येते. ब्राह्मणाच्या काय आणि कोणाच्याही काय वतनाचा लचका काढण्याला तो काढणाऱ्याला रग, ओघ किंवा हिकमत असली पाहिजे, हे सांगणे