पान:गांव-गाडा.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०६      गांव-गाडा.

लोटीत. वतनदारांकडे नजर फेंकल्यास हाच नमुना दिसेल. पाळीप्रमाणे पाटील किंवा कुळकर्ण्यांची नेमणूक होते, आणि नेमलेला पाटील किंवा कुळकर्णी वाकबगार नसला तर नातलग म्हणून काहीएक मोबदला न घेतां त्याचे काम त्याच्या हुषार भाऊबंदास ओढावे लागते, आणि त्याजवर पांघरूण घालावे लागते. पाटीलकुळकर्ण्यांची जबाबदारी नेमलेले इसमावर तरी असते. महारजागल्यांची जबाबदारी समस्त महारजागल्यांवर असते. त्यामुळे त्यांपैकी जे विशेष कुचर असतात, त्यांचा घाव जे सालस व भिऊन वागणारे असतात, त्यांना सोसावा लागतो. सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी हे असाम्या वांटून घेतात. तथापि त्यांमध्ये जे विशेष तरबेज असतात त्यांच्याकडे त्यांच्या गैरहुषार भाऊबंदाच्या असाम्या जातात, आणि आपले काम नीटनेटके करून घेतात. त्याबद्दल त्यांना पूर्ण मोबदला मिळतो किंवा त्या त्यांच्या असाम्या होतात असे नाही. भाऊबंदकी पेशामुळे त्यांना तसे करता येत नाही. गांवच्या परगांवच्या कोणाही असामीला ते साफ सांगतात की, आम्ही जर आज दुसऱ्याचे वतनावर पाय दिला तर तोही आमच्यावर देईल. मात्र अशा कुळांच्या शेतांत गेल्यास ती त्यांना ठराविक बलुत्याचा काही अंश देतात. कारण मामूल बलुतें-आलुतें त्यांना आपल्या वाट्याच्या कारूनारूंला दिलेच पाहिजे. बहुतेक गांवांना लोहार, सुतार, चांभार, मांग असतांनाही घिसाडी, शिकलकर, कंजारी, कुंचीवाले ह्यांच्या टोळ्यांच्या टोळ्या गांवगन्ना हिंडतात, आणि वर लिहिलेल्या बलुतदारांचे जातधंदे करून आपले पोट भरतात. ह्या वस्तुस्थितीवरून हे उघड होते की, बलुत्यापरी बलुते घेऊन बलुतदार आपली जबाबदारी न ओळखतां कामाची हेळसांड करतात; आणि असामीदारांना आपली गरज त्रयस्थाला पैसे अगर धान्य देऊन भागवून घ्यावी लागते. नावाजलेले कुंभार, न्हावी, परीट आसपासच्या गांवांत गिऱ्हाईकी करून धान्य अगर पैसे कमावतात. तेव्हां कामासंबंधाने पहातां कारूनारूंच्या अडाणीपणामुळे, कुचराईमुळे, अगर व्यापारवृद्धीमुळे त्यांचे कुणबीकीचे काम कमी पडले तरी त्यांच्या बलुत्याअलुत्याचा जो मामूल धारा