पान:गांव-गाडा.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २०५

तोच कुणबी आणि अडाणी ह्यांचा होता व आहे. एकत्र कुटुंबांत नाहीं म्हणण्याला जिव्हाळ्याची, आंतड्याकातड्याची माणसें तरी असतात. गांवगाड्यांतील खुंटांत फूट पाडण्यास कुटुंबभेद, जातिभेद, हितभेद वगैरे किती तरी स्फोटक कारणे आहेत. घटकाभर असें मानलें कीं, गांव वसविणारे कुणबी आणि त्यांचे अडाणी सहकारी अगदी जिवास जीव देणारे होते, तरी हा भाव त्यांच्या वंशजांत किती पिढ्या, किती शतकें टिकणार हे गांवगाड्याच्या अभिमान्यांनीच प्रांजळपणे ठरवावें. 'तुझें तें माझें आणि माझें तें तुझें' ह्या भावनेच्या आंखावर गांवगाडा भरला, आणि कुणबी व अडाणी ह्यांची शेत-उत्पन्नांत सरकत ठरली. ही भावना जसजशी कमजोर होईल किंवा युगांतराने कुणब्याला अडाण्यांचा उपयोग कामकमतरतेमुळे, कसबकमतरतेमुळे किंवा कामकुचराईमुळे जसजसा कमी होईल तसतशी ही सरकत तुटली पाहिजे, किंवा तिची आणेवारी तरी फिरली पाहिजे. स्वराज्यांत गांवच्या दरएक बाबतीत जरी सबंध गांव एकजथ्याने जबाबदार धरला जात असे, तरी त्यांत जे कोणी धेंडे असतील ते पुढे होऊन सर्व भार भिडस्त कुणब्यावर घालून गांवची जबाबदारी पार पाडीत. 'गांवापुढे कोठे जावे' असे म्हणून तो स्वस्थ बसे. आणि त्याला कोणी बोल बोलू देत नसे. कधी असेंही होई की, राजाधिकारी, धर्माधिकारी किंवा बंडखोर एखाद्या गांवकऱ्याबद्दल किंवा सबंध गांवाबद्दल गुन्हेगारी अगर लूट गांवच्या पुढाऱ्यांपासून घेत, आणि इतर हिस्सेरशीनें त्याची भरपाई करीत. पण 'राखील तो चाखील ' ह्या वहिवाटीप्रमाणे पुढाईतांच्या पदराला खार न लागतां अशा बाबतीत त्यांचा उलट लाग लागे. त्याचप्रमाणे कांहीं गांवकीचा खर्च निघाला तर तो यथान्याय सर्वच देत, असें घडत नव्हते. संभावितावर त्याचा भार पडावयाचा आणि कलभांड निसटून जावयाचे, असली त्याची हिस्सेरशी सामान्यतः होत असे. कुणबी आणि अडाणी ह्यांच्या बोजांची वाटणी बहुधा कुणब्याला प्रतिकूल होत असे. त्याचे उत्पन्न ढोळेफोड असल्यामुळे त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून देऊन बहुधा अलाय-बलाय अडाणी त्याच्यावर