पान:गांव-गाडा.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४      गांव-गाडा.


कळकळीने हात द्या, जिव्हाळ्याच्या स्वकीयांना विनाकारण डावलून परकीयांना जवळ करूं नका, आणि एका दिव्याखाली दहाजण इमानेंइतबारें आनंदाने नांदा. पण केवळ स्वकीय आहेत म्हणून त्यांना निरुद्योगी ठेवून त्यांचा भार युगेच्या युगें वाहण्याने व त्यांच्या दुर्गुणांवर पांघरूण घालीत राहण्याने नुसती कुटुंबहानिच होते असें नाहीं तर समाजावनतिही होते, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा.

 गांवगाडा म्हणजे एकंदर गांवचे एकत्र कुटुंब; त्यांत कुणबी हा कारभारी, स्थायिक वतनदार हे कुटुंबीय, आणि फिरस्ते सोयरे किंवा इष्टमित्र असा घाट दिसून येतो. वेळी अवेळी परदेशस्थ-प्रवाशी आमच्या गांवगाड्याचे फार स्तुतिपाठ गात आले आहेत, आणि त्यावरून आम्ही आपली अशी समज करून घेतों की, एका काळी आमचा गांवगाडा म्हणजे मानवी चातुर्याची पराकाष्ठा होती; आणि आतां इनामदार, वतनदार, जातधंदे, वतनें नाहीशी होत चालल्यामुळे त्यांत बिघाड झाला आहे. गांवमुकादमानीत कांहीं वतनदारांची योजना सरबराईकडे असे. कोणी पांथस्थ आला तर त्याची बरदास्त गांवखर्चाने होई. त्याला शिधापाणी द्यावयाचे, व घोडे, गाडी, म्याना, वाटाडे, भोई वगैरे देऊन आपले हद्दीतून त्याची रवानगी करावयाची हा धारा असे. गांवचे उत्पन्न बहुतेक सर्वांना वांटले जात असे, व गांवांतच अनाथ-अपंगांच्या अन्नवस्त्राची सोय लागे. तेव्हां 'दामाशिवाय काम नाही' अशा देशांतल्या पांथस्थांना फुकटच्या पाहुणचाराचे ढेकर देतांना आमचा गांवगाडा स्पृहणीय दिसला, तर त्यांत आश्चर्य तें कोणते ? 'उपर खूप बने, अंदर राम जाने.' गांवकींतील काम व दाम ह्यांचा त्यांनी जरा हिशेब पाहिला असता तर त्यांना असे आढळून आले असते की, गांवचा सर्व भार कुणब्याने आपल्या माथीं मारून घेतला व अडाण्यांच्या कामाचा हिशेब न घेता तो त्यांचा योगक्षेम चालवीत आहे, आणि काम केलें केलें, न केलें न केले, अशा बेजबाबदारीने ते कुणब्याच्या जिवावर दिवस काढीत आहेत. एकत्र कुटुंबांतील कर्ते स्त्रीपुरुष व त्यांच्या छत्राखालचे नातलग ह्यांचा जो संबंध