पान:गांव-गाडा.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फसगत.      २०३

म्हणून आमच्यासाठी धांवले ह्यांत जगविरहित काय केलें, सावध इसमांनी कुतंगळांना आपंगिलें म्हणून काय झालें,' असले तर्कट चालविण्याला सर्व बैठे तयार असतात; आणि अखेर वांटणीची वेळ आली म्हणजे समसमान हिस्सा न घेतां, 'आम्ही अडाणी, आमच्याने काम होत नाही,' असें रडगाणे गाऊन खर्च व कर्ज दुसऱ्यांवर ढकलून रुसून फुगून ते जास्त हिस्सा उपटण्याला टपलेले असतात. जेव्हां आपला व्यवहार आपल्या आपल्यांतच होता, परप्रांतीय व परदेशीय लोकांशी आपला नानाविध संबंध जडला नव्हता, तोपर्यंत जेथला दाणा तेथेच राहून कणसुकाळ होता, माणसांचें घर सुटत नसे, व दूरवर कोणी जात नसे. त्यामुळे एकमेकांचे एकमेकांना अगत्य पडे, व घरच्या, गांवच्या लोकांची दहशत सर्वांना वाटून जो तो काही तरी मर्यादेनें राही. तेव्हां साध्या भोळ्या घरकोंड्या काळांत हा एकत्र कुटुंबव्यवस्थेचा पांगूळ गाडा ओढणे फारसें जाणवले नाही. आतां तशी स्थिति उरली नाही, आणि पूर्वीपेक्षा जो तो अज्ञानाने म्हणा, अनुकरणाने म्हणा, किंवा चिथावणीने म्हणा, आपल्यापुरते पाहूं लागला आहे. धाकट्या भावाला थोरल्या भावांतून फोडून त्याला दौलत मिळवून देतो, अशा थापेवर खोटा भरणा दाखवून त्याच्या मिळकतीची पोकळीस्त खरेदी करून वांटणी झाल्यावर ती पोकळिस्त खरेदीदारांनी खुशाल गिळंकृत करून 'जोग्यांनी जोडलें, आणि कुत्र्यांनी तोडलें' अशा प्रकारचे दाखले शेंकड्यांनी मोजता येतील. हे एक उदाहरण झालें, व ह्यावरून दुसरी सहज ताडतां येतील. तात्पर्य, एकत्र कुटुंबव्यवस्थेचा काळ गेला. आयबछुपायी करून आतां पूर्वीप्रमाणे तिला सर्रास चिकटू म्हटले तर कुटुंबांत आळशी, बेजबाबदार लोक जास्त निघून घरच्या दारच्या आपमतलब्यांचे आयतें साधते व साधेल; आणि ' मेहनती दिलगीर व चोरटे हुशार' अशांतली आपल्या समाजाची स्थिति होईल. एकत्र कुटुंबव्यवस्थेचे आद्य हेतु पुढे ठेवून अलबत चाला, मनुष्य परिपूर्ण प्राणी नाही हे ध्यानात धरून कुटुंबीयांची कसूर क्षम्य मर्यादेत आहे तोपर्यंत ती मनांत आणू नका, त्यांना