पान:गांव-गाडा.pdf/223

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२      गांव-गाडा.

पडते. एवंच मजुरांचा प्रश्न उपस्थित होतो. जुनें गेलें आणि नवें हाती आले नाही, म्हणून सध्या खेड्यांत काय किंवा शहरांत काय मजुरांच्या तुटवड्याची तीव्रता कशी जाणवत आहे हे सर्वश्रुत आहे. मजुरी अगर अंगमेहनत चुकविण्याची व दुसऱ्याकडून ती करून घेण्याची प्रवृत्ति वाटण्यावरोबरच, किंबहुना त्यांपूर्वी व त्यांपेक्षा जास्त प्रमाणावर अलीकडे बळावत चालली आहे. तिजमुळे अल्पशा रोजावर ‘काम द्या, काम द्या ' म्हणणारी माणसें ज्या देशांत रेलचेल आढळत, तेथेच आता 'मजूर नाही काय करावें, हे काम पडून राहिले, त्यांत मजुरीने कांहीं हातीं लागू दिले नाही' अशी हाकाहाक ऐकू येते. एकत्र कुटुंब म्हणजे सेव्यसेवकभावाचा सर्वतोपरी अत्यंत सुखकर व उत्तेजक म्हणून स्पृहणीय संगम होय. वाटणीपूर्वी-एक(कर्ता)मालक आणि बाकी चाकर-असे जरी नाते असते, तरी कुटुंबाच्या लाभालाभांत सर्वांचेच हिताहित प्रत्यक्ष असल्यामुळे मालक तोच चाकर आणि चाकर तोच मालक असें आशापूर्ण व जबाबदार ममत्व यच्चयावत् कुटुंबीयांमध्ये निर्माण होते. परंतु हे विसरून घरची बहुतेक माणसें कामाची आंच न धरितां कुचराई, चालढकल करूं लागली, त्यांच्या मनांत प्रतारणेचा प्रवेश झाला, व ती आपल्या पोळीवरच तूप ओढूं लागली, अवश्य तितकें ज्ञान त्यांमध्ये नसले, 'जाईल तर सर्वांचे जाईल, माझें एकट्याचे त्यांत कितीसें जाणार, गळफांस लागला तर कर्त्याचे नरडीला, आपल्यापर्यंत येतो कोण,' अशी एकमेकांविषयीं व कुटुंबाच्या समायिक हिताविषयी बेपर्वाई सुरू झाली, तर एकत्र कुटुंबाची काय गति होते ? एकीकडे त्यांतली मैंद, चुकारतट्ट व खुशालचेंडू मंडळी सावलीत व आरामांत दिवस काढते; तर दुसरीकडे त्यांतले जे मेहनती, शहाणे स्त्रीपुरुष असतात, त्यांना हाडांची काडे आणि रक्ताचे पाणी करावे लागते; कमी पडेल तेथे त्यांनाच उडी घालून खांदा द्यावा लागतो, व प्रसंगानुसार खर्च करून कुटुंबाचें नांव राखावे लागते, आणि कुटुंबीयांची गैरसोय, हाल दूर करावे लागतात. इतके करून पुनः भार ना उपकार. 'आमचेच होते