पान:गांव-गाडा.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



फसगत.
----------

 गांवमुकादमी उर्फ वतनी ग्रामव्यवस्थेचा वरवर विचार केला तरी एकत्र कुटुंबव्यवस्थेची आठवण झाल्यावांचून रहात नाही. एकत्र कुटुंबांतील बायकामुलांसुद्धां झाडून सारी निदान बहुतेक माणसें जर अंग मोडून काम करणारी, आजें दुजें न पाहणारी, एकदिलाची, शहाणी, व दक्ष असली तर एकत्र कुटुंबव्यवस्थेसारखी व्यक्तीचे, त्यांनी बनलेल्या कुटुंबाचे, व एकंदर समाजाचे, हित साधणारी दुसरी संस्था क्वचितच दाखविता येईल. एकटा मनुष्य कोठे कोठे डोके देईल ? रोजच्या व्यवहारांत देखील त्याला दुसऱ्याचे साह्य घेतले पाहिजे. मग प्रपंच चालविण्यास किंवा प्रपंचासाठी साध्य तो धंदा करण्यास त्याला मदत व सहकार्य पाहिजे हे स्वयंसिद्ध आहे. लाकडाच्या तंगडीचें व कुबडीचें नेट घेऊन चालणारापेक्षा ज्याचे हातपाय आंगचेच आहेत तो किततरी सुखाने, अवसानाने व जलद चालतो ? त्याचप्रमाणे आपली सपिंड नात्यागोत्याची, लाभावीण प्रीति करणारी, जातिवंत कनवळ्याची माणसे दूर करून धंद्यांतील सामान्य हितापेक्षा ज्यांचा दुसरा संबंध नाही अशा माणसांच्या बळावर धंदा करणे धोक्याचे म्हणून तोट्याचे आहे हे कोणीही कबूल करील. हजारों वर्षांपासून आमच्यांत हुन्नरी लोक प्रचंड कारखानदार नसून घरच्याघरी आटोपसर धंदा करणारे झाले आहेत; आणि आम्ही मजुरांच्या पुरवठ्याचा बिकट प्रश्न एकत्र कुटुंबव्यवस्थेच्या जोरावर बराचसा सोडविला आहे. वांटणी झाली म्हणजे सर्व वांटणीदार चाकर न राहतां मालक होतात, आणि एक तर मालकीची सर्व जोखीम त्यांच्यावर पडून त्यांना जरूर तितकी अंगमेहनत होत नाहीं, अगर मालकाचे वारे त्यांच्या अंगांत शिरून त्यांना स्वतः राबण्यापेक्षा हुकमत चालविण्याची जास्त हौस वाटते; व अशा प्रकारे अंगमेहनतीला घरची माणसे अपुरी पडली म्हणजे बाहेरची लावणे भाग