पान:गांव-गाडा.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १९९

बरें ? कोणता इसम वायदा चुकविणारा नाही, शब्दाचा धड कोण नाहीं, थापाथुपीवर पैसा मिळविणारा कोण आहे, पैसा बुडविणारा कोण आहे, केव्हां तगादा केला असतां पैसे निघतील, पैसे काढण्यास काय काय उपाय योजावेत इत्यादि गोष्टींकडे सहकारी मंडळीच्या सभासदांना अतिशय बारीक नजरेने पाहिले पाहिजे. अशी नजर गुजराती, मारवाडी ह्यांना असल्यामुळे ते तरले आणि ती दक्षिणी मंडळीत नसल्यामुळे त्यांची दुकानें बसली. गुजराती-मारवाड्यांच्या पोटांत शिरून आम्ही ह्या गोष्टी शिकावयास पाहिजे होत्या, पण पोकळ घमेंडीमुळे शिकलों नाही. आतां सरकारचे देखरेखी व शिकवणीखाली सहकारी मंडळीच्या सभासदांना त्या आयत्या शिकायला सांपडतील व स्वतःचे पैसे बुडण्याची भीति असल्यामुळे सभासद त्या लवकर शिकतील. तसेंच, सार्वजनिक पैशाच्या व्ययाकडे कानाडोळा करण्याची जी दुर्बुद्धि आमच्यांत शिरली, ती केवळ स्वहितामुळे लयास जाईल, आणि चारचौघांनी मिळून मिसळून एकमेकांचे हित कसे साधावें ह्याचेही उत्तम वळण लागेल. वेळच्यावेळी पैसे भरण्याची संवय आम्हांला नसल्यामुळे आम्हांला व्याजही जास्त पडते आणि आमची ही संवय हिशेबांत धरूनच व्यापारी पुष्कळसा नफा घेतात. आपली नापत होईल, नुकसान होईल, या भीतीने पतपेढीचे कर्जदार सभासद आपले हप्ते वेळच्या वेळी भरतील आणि मंडळीही स्वहितरक्षणासाठी त्याजबद्दल खबरदारी घेईल. सहकारी मंडळी म्हणजे गांवांत नीतिमान् स्त्रीपुरुष बनविणारा एक परीस होईल, व तिच्याजवळ गांवच्या नैतिक गणतीचा आंकडा चटकन मिळेल. तिच्यामुळे आमच्या भोपळसुती स्वभावाला आळा पडेल. तिच्यापासून दुसरा कोणताही नफा झाला नाही, आणि वायदा टळू न देण्याची संवय जरी तिने आम्हांला लाविली तरी देखील आमचें कोटकल्याण तिने केले, असे समजण्याला हरकत नाही.

 सहकारी मंडळीने देण्याघेण्याखेरीज एक गोष्ट ताबडतोब हाती घेण्यासारखी आहे. कुणबी आपला माल एक सट्टा न विकता जशी गरज पडेल तसा त्याचा मोबदला करतो. तसेंच खरेदीही तो एकदम न