पान:गांव-गाडा.pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भरित      

 कसबा हा शब्द निघाला आहे. व्यापार, हुन्नर व कसबी मजुरी करणारे लोक मौज्यापेक्षां कसब्यांत अधिक असतात; आणि कसब्याखालीं वाड्याही जास्त असतात. कसब्याचें गांव मौज्यापेक्षां जास्त विस्तृत, चव्हाट्याचें, रोजगारी व संपन्न असतें. गुजराथेंत नागरिकांना 'कसबाते' म्हणतात. मोठ्या व्यापाराच्या गांवाला पेठ म्हणतात. पेठ म्हणजे बाजार किंवा दुकानांनीं व्यापलेला गांवाचा भाग. मनुष्यगणतीच्या वेळीं सरकारनें ठोकताळ्यानें असें ठरविलें कीं, पांच हजारांवरील लोकसंख्येच्या गांवाला शहर म्हणून व त्याखालील लोकसंख्येच्या गांवाला खेडें म्हणून दाखल करावें. परंतु एखाद्या गांवाला खेडें किंवा शहर हें नांव लोक देतात, तेव्हां ते लोकसंख्येबरोबर किंबहुना जास्ती उद्योगधंद्याच्या प्रकारावर लक्ष देतात. गांवची हुन्नरी व व्यापारी वस्ती फुगली आणि काळीपेक्षां पांढरी बळावली कीं त्या गांवाची शहरांत गणना होऊं लागते. खेडणें म्हणजे जमीन कसणें आणि खेडू म्हणजे जमीन कसणारा. तेव्हां खेडूंची जी वस्ती तें खेडें. ज्यामध्यें प्रधान धंदा शेती व ज्यामध्यें भरण्याची वस्ती शेतकऱ्यांची असते, त्या गांवांला लोक खेडें किंवा गांवढे म्हणतात आणि तध्व्यतिरिक्त गांवांना शहर मानतात. लोकरूढ़ींत खेड़ें आणि गांव हे बहुतेक समानार्थक शब्द होऊन बसले आहेतं. गांव-गाडा, गांवकी, गांवमुकादमानी, गांवपंचाईत, वगैरे शब्दांत गांव हा शब्द शहरापेक्षां खेडें ह्या अर्थानें योजिला आहे हें सांगणे नको.

 कोणत्याही गांवाला गेलें तरी मध्यें पांढरी व सभोंवतीं काळी दृष्टीस पडेल. गांवच्या बंदोबस्तासाठीं घांटावरील पुष्कळ गांवांसभोंवतीं गांवकूस किंवा कोट केले असून त्यांतून गांवांत शिरण्याला एक अगर अधिक वेशी असतात. पुष्कळ ठिकाणीं गांवकूस व वेशींची निगा न राहिल्यामुळे पडझड व मोडतोड झाली आहे. त्यामुळे गांवाची हवा, उजेड हीं खेळतीं झालीं आहेत, हें सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनें एकपरी बरें झालें म्हणावयाचें ! स्पृश्य जातींचीं घरें वेशीच्या आंत असतात; आणि