पान:गांव-गाडा.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १७१

च्यांत काहीएक आला नाही, आणि व्यापारी कलेत आम्ही अजून अगदी वन्यावस्थेत राहिलो. त्यांनी आम्हांला भिकारी केलें म्हणण्यापेक्षा श्रीमंत कसे व्हावें, संपत्ति कशी जतन करावी व वाढवावी हे आम्ही त्यांच्या मूर्तिमंत उदाहरणाने देखील शिकलो नाही, असे म्हटले तरी चालेल. हा आमचा दोष आहे. एक तर व्यापाराकडे आमचें आनुवंशिक दुर्लक्ष आणि दुसरे असे की, पाण्यांत पडल्याशिवाय पोहतां येत नाही. आम्हीही आपण होऊन व्यापारांत पडलों नाही, आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांनीही आम्हांला बोलावून आपले गोटांत घेतले नाही. व्यापारांत पडण्याची जी संधि आजवर आली नाही ती पतपेढी आज आमच्या मुठीत आणून देत आहे.

 शिल्लक टाकण्याला प्रपंचाची पुष्कळ ओढाताण करावी लागते. सहकारी मंडळींत भांडवल घालावे असा निर्धार केला म्हणजे काही तरी शिल्लक पडावयाचीच. निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेंचि फळ ॥ ही साधूक्ति त्रिकाली खोटी होणार नाही. तेव्हां पैसे सांचविण्याला शिकणे हा पहिला धडा सहकारी मंडळीपासून शिकता येईल. शिल्लक पडलीच तर ती सुरक्षित व किफायतशीर ठेवण्याला जागा नाही. पोस्टाच्या बँकेत ठेवावी तर व्याज कमी मिळते, आणि पोस्टें तरी गांवोगांव आहेत कोठे ? दागिन्यांत गुंतलेल्या पैशाला व्याज नाहीं, व ते झिजतात, आणि विकण्याच्या वेळी आडवून कोणी त्यांची पुरी किंमत देत नाही. ह्या सर्व गोष्टी थोड्या फार कानावरून गेल्या असल्या तरी देखील लोक दागदागिने करतात. ह्याचे कारण असे की, अडचणीच्या प्रसंगी रक्कम उभी राहते. पतपेढीवर ठेविलेली रक्कम जर चालू ठेवींत असली तर तीही अशीच वाटेल तेव्हां मिळेल, व शिवाय तिजवर थोडेसें व्याजही मिळतें. व्याज मिळविण्याची गोडी एकदां लागली, म्हणजे मनुष्य ओघाओघाने व्याजाच्या आशेनें काटकसरी बनून शिल्लक टाकू लागतो. व्याज खाणे म्हणजे काय ? हे पिढ्यान् पिढ्या ज्या लोकांना माहीत नाही अशांना व्याजाची चटक सहकारी मंडळीने लावली तर हा केवढा मोठा लाभ आहे