पान:गांव-गाडा.pdf/218

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कुणबी.      १९७

झाली आहे, त्यांत कुणबी हा अग्रगण्य आहे. तेव्हां जसजशा सहकारी मंडळ्या जास्त निघतील तसतसा एकंदर लोकांत विशेषतः कुणब्यांत व्यापारी शिक्षणाचा व कौशल्याचा जास्त फैलाव होईल. आणि हे शिक्षण जगांत जे आज शंभर नंबरी व्यापारी इंग्रज लोक त्यांच्याकडून प्रत्यक्ष मिळणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेविली, म्हणजे आम्ही जितक्या अशा मंडळ्या लवकर काढू तितकें इष्टच आहे. ह्या मंडळया स्थापन झाल्याने त्यांच्या सभासदांचा फायदा होईलच होईल. पण त्यांच्या उदाहरणाने एकंदर जनतेचा फायदा झाल्यावांचून राहणार नाही. दक्षिणेतले कुणबी काय आणि इतर जाती काय, कोणालाही व्यापारी पोंच किंवा पेंच बिलकुल नाहीत. चांगल्या षटशास्त्रांच्या प्रपंचाची हातोटी पाहिली तरी 'आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खातें' अशांतलीच. बाजार कसा काय आहे, पेठेत जिनसांचे भाव काय आहेत, आपल्या गांवचा उदमी काय दराने विकतो, ह्याबद्दल माहिती मिळविण्याची खटपट न करतां फार तर गांवचे गांवांत पडताळा पाहून माल घ्यावयाचा, व खाते मांडून द्यावयाचं, आणि पैसा अगर शेतमाल हाती येईल तेव्हां तो देऊन खातें चुकतें करावयाचे ही पद्धति वेदविद्येत किंवा कारकुनी कसबांत निपुण अशा पुष्कळ ब्राह्मणांची दिसून येते. खातें फुगले म्हणजे चांगले वैदिक, गोसावी, पुराणिक मुलुखगिरीला निघत, हजार पांचशे मिळवून आणीत व वाण्याच्या घरी तसेंच गांठोडें रिचवीत, आणि पुन्हां खातें सुरू करीत; असा परिपाठ बऱ्याच ठिकाणी नजरेस आला. कुळकर्णी वगैरे लोकांचीही सर्रास हीच वहिवाट आहे, हे त्यांच्या मुशाहिऱ्याच्या वेळी मामलेदार कचेरीच्या आजूबाजूला घिरट्या घालणाऱ्या उदम्यांना पाहून कोणालाही ताडता येईल. कलम बहाद्दर ब्राह्मणसमाजाची ही परवड तर मग इतर निरक्षर समाजांची काय अवस्था असते हे प्रत्यक्ष शब्दांनींच वर्णिले पाहिजे असे नाही. व्यापारपटु गुजराती, मारवाडी, लिंगायत वगैरे समाज आमचेमध्ये शेकडों वर्ष राहत असून ' सोन्याचा गुण सवागीला' बिलकुल लागला नाही. त्यांचा व्यवहार, धूर्तपणा, मितव्यय बगैरे आम-