पान:गांव-गाडा.pdf/211

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०      गांव-गाडा.

तेंच नांव चालविले. तगाई हा मोठा अर्थपूर्ण शब्द आहे. तगणे म्हणजे कष्टाने जीव धरून राहणे. थकवा आल्यावर जी थोडीशी हुषारी येते तिचे नांव तकवा. कुतंगळ कुळाला तकवा आणण्यासाठी जें कर्ज सरकार देतें तें तगाई. हा अर्थ लक्षात आणून जर कुळे आपल्या गरजेपुरतें कर्ज काढतील तरच सरकारचा हेतु सफल होईल. पण लोक ओढगस्त असल्यामुळे ज्या कामासाठी कायद्याने तगाई देतां येत नाही त्यासाठी पैसे लागले तरी पाटीलकुळकर्ण्यांच्या मदतीने कायदेशीर कारण दाखवून तगाई काढतात, आणि त्यामुळे तगाईनें शेतसुधारणा किंवा शेतीचे कामाला मदत होण्याचे एकीकडेच राहून कर्जबाजारीपणा मात्र पुष्कळ ठिकाणी वाढला आहे. असली फसवाफसवी करून आपण मोठी चूक करतो, असे लोकांना मनापासून वाटत नाही. कुणब्याला वाटते की, आली गरज भागविली पाहिजे, आज थोड्या व्याजाने रक्कम मिळते ती घेऊ, आणि बरा दिवस आला म्हणजे फेडून टाकू; ती मिळण्याकरितां खोटे बोलावे लागले आणि लांचलुचपतही यावी लागली तरी त्यांत मोठेसें कांही गैर नाही. कोणाचीही गरज भागविण्याला मदत करणे पुण्य आहे, शिवाय वेळेवर उपयोग केल्याचा उपकार कुळांवर होतो, तेव्हां तेवढ्यासाठी थोडेसें लबाड बोललें म्हणजे पाप लागेल असें नाहीं असें पाटीलकुळकर्ण्यांला, कुळाचे जामीनदारांला, किंवा त्याच्या शेताचा व कल्पित शेत-सुधारणेचा कयास करणाऱ्या पंचांना वाटते. आपले मदतीशिवाय तगाई मिळत नाही हे ध्यानात आणून हे लोक आपली कसर जाऊं देत नाहीत; निदान तगाईचे कागद करण्यासाठी अगर जाबजबाबासाठी ठाण्यांत किंवा अंमलदारांच्या स्वारीत, पाटील, कुळकर्णी, जामीनदार, पंच वगैरेंना जाणे पडले तर सर्वांचा वाटखर्च व भोजनखर्च तरी कुळांवर बसतोच बसतो. तगाई वाटण्याचे दिवसांत तालुक्याच्या ठाण्यांत हलवायाची भट्टी पेटलेली असते; कारण सोकावलेल्या मंडळींना ओल्या कोरड्या दशम्या भाकरी जात नाहीत, मिठाई लागते. कुणब्याला असे