पान:गांव-गाडा.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
गांव-गाडा.

जागेत ती पिकें करतात, तिला काळी, आई-काळी, रान किंवा शिवार म्हणतात. कालेंकरून पांढरी व काळी ह्यांचा अर्थ अनुक्रमें पांढरीत व काळीत द्यावे लागणारे कर असा होऊन बसला; जसे, मी पांच रुपये काळी देतो. पांढरी म्हणजे गांव किंवा लोकवस्ती आणि काळी म्हणजे शेतकरी वर्ग असाही भाषणसंप्रदाय रूढ आहे; जसें ही गोष्ट काळी पांढरीला माहीत आहे. शिवेच्या आंतील पांढरीव्यतिरिक्त सर्व भूभाग-शेते, खराबा, चराई, नद्या, नाले, मसणवाटा, माळमुरडण इत्यादि-शिवार ह्या शब्दांत समुच्चयाने येतात. काळी-पांढरी मिळून झालेल्या गांवाला जुन्या कागदपत्रांत “देह" संज्ञिलें आहे. काही ठिकाणी गांवठाण सोडून मनुष्यवस्तीची छपरे, झोपड्या, झांप, घरें इत्यादि दृष्टीस पडतात. गांवठाणापासून दूरदूरची जमीन जसजसे लोक लागण करूं लागले तसतशा शेताच्या येरझारा त्रासदायक होत गेल्या व शेतीतला नफाहा पुरता मिळेनासा झाला. म्हणून शेतांत किंवा त्यांच्या आसपास राहण्याची गरज जास्त भासू लागली. ह्या व ह्यासारख्या दुसऱ्या कारणामुळे शेतकरी शिवारांत कायमची वस्ती घालू लागले. अशा प्रकारची शेतांत एक दोन घरे असली तर त्यांना झांप, आवसा, कोठा, गोठा किंवा पडाळ (पर + आलय ) म्हणतात; आणि ती दहा पांच किंवा अधिक असून त्यांचें छोटेखानी गांवठाणच बनलें तर त्याला वाडा, वाडी, मजरें, पाडा असलें नांव प्राप्त होते. पाडा, वाडा, वाडी अगर मजरें मूळ गांवच्या अंगभूत असते, आणि कागदोपत्री अमुक गांवची अमुक वाडी अगर मजरें याप्रमाणे उल्लेखितात. वाडीची वस्ती जसजशी वाढते व संपन्न होते, तसतसा तिला गांवाचा आकार येतो; आणि मूळ गांवाला मागे टाकणाऱ्या व हा मूळ गांव का वाडी असा पांथस्थांना बुचकळा पाडणाऱ्या वाड्याही क्वचित् आढळतात. अव्वलपासुन आपल्याकडे खेडेगांवांचे दोन भेद मानतात. एक मौजे आणि दुसरा कसबा. कसब ( कला अगर हुन्नर) ह्या शब्दापासून