पान:गांव-गाडा.pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गांव-गाडा.
-----
भरित.
-----

पुराणांतरीं गांवाची व्याख्या अशी दिली आहे-

   तथाशूद्रजनप्राया सुसमृद्धकृषीवला ।
   क्षेत्रोपभोगभूमध्ये वसतीर्ग्रामसंज्ञिता ॥

 जिच्यासभोंवतीं कीर्दसार- वहितीला योग्य- जमीन आहे, आणि जिच्यामध्यें मातबर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत, अशा वस्तीला गांव म्हणतात. गांवच्या हद्दीला किंवा सीमेला " शींव ” ही संज्ञा आहे. गांवाचे स्वभावतः आणि एकमेकांपासून अलग असे दोन भाग उघड उघड पडतात. एक ' पांढरी ' किंवा गांवठाण आणि दुसरा ‘काळी’ किंवा रान. काळी आणि पांढरी ह्या संज्ञा जमिनीच्या रंग व गुणधर्मावरून प्रचारांत आल्या असाव्या. काळी जमीन काळी किंवा काळसर असून भुसभुशीत असते, ती पाणी धरते व खचते. पांढरी जमीन पांढरसर, आवळ व निबर असून पाणी ढाळते. ह्यामुळे काळी जमीन जितकी वहितीला उपयोगी, तितकी इमल्याला नसते; आणि पांढरीवर जसा इमल्याला धर सांपडतो, तसा कंदमूलांना किंवा उद्भिज्जांंच्या मुळ्यांना तिच्या पोटीं वाव सांपडत नाहीं. प्रत्येक गांवांत शक्यतेप्रमाणें पांढऱ्या जमिनीची योजना गांवठाणाकडे आणि काळीची योजना शेतवाडीकडे झालेली दिसते ती निसर्गानुरोधानेंच आहे, हें कोणाच्याही लक्षांत येईल. तेव्हां गांवाच्या ज्या जागेवर मनुष्यें घरेंदारें करून नांदतात तिला पांढरी, आई-पांढर किंवा गांवठाण म्हणतात, आणि ज्या