पान:गांव-गाडा.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८      गांव-गाडा.

नाहींत. वेळेवर ते त्यांना गैरकायदा अटक किंवा मारपीट करतात, बायकांची अब्रू घेण्याची किंवा तोंडांत थुंकून धर्म बाटविण्याची अगर गांवच्या मारुतीला उपटून बांधून नेण्याची दहशत घालतात. कोणत्याही लोकांत बायका आणि धर्म ह्या बाबी किंती नाजूक आहेत आणि त्यांप्रीत्यर्थ लोक जिवाचीसुद्धां पर्वा करत नाहींत हें नव्यानें सांगितलें पाहिजे असें नाहीं. तेव्हां बायकाधर्मावर मजल येऊन बेतली म्हणजे वेळेला गांवचा तिऱ्हाईत पैसा भरतो, आणि पठाणांचे मगरमिठीतून देणेदाराला सोडविण्याचे पुण्य जोडतो. त्यांची जरब इतकी बसली आहे कीं, लोक हें सर्व निमूटपणें सहन करितात, हूं का चूं करीत नाहींत, किंवा फिर्याद देण्याला अगर त्यांचेविरुद्ध पुरावा करण्याला धजत नाहीत. त्यांच्या छळाच्या व अब्रू घेण्याच्या भीतीनें कोठें कोठें भेकड गांवढेकरी परागंदा झाल्याचीसुद्धां जनवार्ता आहे. हे एका वर्षाचे आंत रुपयाला रुपाया काढतात. त्यावरून लोक किती बुडत असतील ह्याची अटकळ कोणालाही येण्यासारखी आहे. यांच्यासंबंधानें दुसरी गोष्ट अशी आहे कीं, ह्यांतले पुष्कळ पक्के गुन्हेगार असतात. ते उचलेगिरी करतात, दरोडे घालतात, जुवा खेळतात, गैरकायदा दारू व अफू विकतात, खोटे दागिने, खडे, व नोटा चालवितात, आणि धन्यापाशीं पहिल्यानें साक वाढवून पुढें त्याचे तगाद्याचे पैसे गट्ट करतात. गांवच्या लुच्यासोद्यांची व ह्यांची चांगली दोस्ती असते. सडेफटिंग असल्यामुळे ते व्यभिचार करतात, व डांगाणाचे जंगलांत ते दारूही गाळतात. सारांश, दमकोंड्यांचा व्यापार जळजळाटाचा आणि चालरीत लबाडीची आहे. ह्या मुलखांत ते पापपुण्याची भीति

-----

 १ असाम्यांना छळून ठोकून त्यांनीं पैसे काढून घेतल्याचीं उदाहरणें वाटेल तितकीं मिळतील. परंतु पैशासाठीं ते कोठवर गळ टाकतात याचा एक चमत्कारिक मासला खानदेशांत चोपडें येथें १९०८ सालीं पहाण्याला मिळाला. तेथील पठाणांनीं एका कुट्टीनीमार्फत एका बारा तेरा वर्षांच्या हरदासणीच्या बापाला १५० रुपये देऊन तिच्याकडून नवऱ्याला काडी मोडून देवविली, आणि असा सौदा केला कीं, तिला लेणें, खाणें, पिणें द्यावें व तिनें कसब करून सर्व कमाई त्यांना द्यावी !