पान:गांव-गाडा.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १६७

संबंधाने मात्र ही म्हण उफराठी दिसते. कोठे कोठे सावकार लोक ह्यांना रखवालीसाठी किंवा तगाद्यासाठी चाकरीस ठेवितात. हे लोक बहुधा व्याजबट्ट्याचा धंदा करितात, आणि काही उधारीने कापड, सुऱ्या, चाकू, कात्री, सुरमा, औषधी, खोटे दागिने, खडे, नोटा वगैरे विकतात. मेंढवाड्यांत जसा लांडगा उतरावा तसा इकडील लोकांत पठाण, अशी स्थिति आहे. ज्याला कोठेही कर्ज किंवा उधार माल मिळत नाही, तें पठाणांचें गिऱ्हाईक. परंतु अलीकडे बरे म्हणविणारे शेतकरी व किरकोळ उदमीही त्यांजपासून कर्ज घेऊ लागले आहेत. ते तारण किंवा दस्तैवज घेत नाहीत, आणि हंगामापर्यंत वाट पाहण्याचे कबूल करतात. त्यांमुळे गिऱ्हाइकाला बरे वाटते, आणि मग रुपयाला दरमहा एक ते चार आणे सुद्धां व्याज किंवा नफा देण्याचें तें कबूल करतें. सरासरीने त्यांचे व्याज दरमहा दर रुपयाला दोन आणे पडते. यदाकदाचित् त्यांनी दस्तैवज करून घेतला तर ते त्यांत कर्जाचे तिप्पट रकमेचा भरणा दाखवितात, आणि स्टँपाचा खर्च, मनोती, महिन्याचे व्याज, धर्मफंड अगाऊ कापून घेऊन बाकी रक्कम कुळाच्या पदरांत टाकतात, असा चहूंकडे बोभाटा आहे. एका रोहिल्याने कोर्टापुढे साक्षींत सांगितले की, मुसलमानांजवळून व्याज घेणे निषिद्ध असल्यामुळे आम्ही मुसलमानांकडून व्याज घेत नाही. इकडील मुसलमानांना ही ढील मिळते हे त्यांतले त्यांत बरे आहे. पण तिचा सर्व वचपा ते हिंदूंवर काढतात. उगवणीसाठी त्यांना स्टँँप, रजिष्टरकचेरी, किंवा कोर्ट यांची गरज लागत नाही. वायदा भरला की, दोन तीन जवान पलटणीतल्या शिपायासारखा पोषाक करून चाबूक सोटे घेऊन निघतात, आणि तांबडे फुटले नाही तोच ते आक्राळ विक्राळ स्वरूपानें कुळाच्या दारांत दत्त म्हणून उभे राहतात. फिरून ये म्हटले की, आपल्याभोवती चक्कर देऊन तेथेंच उभे, दम धर म्हटले की नाक दाबलेंच. कुळाला उसासा म्हणून ते टाकू देत नाहीत, व बायकांना पाण्याला किंवा पुरुषाला कामाला देखील घराबाहेर निघू देत