पान:गांव-गाडा.pdf/187

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६      गांव-गाडा.

तेव्हां स्वसंरक्षणार्थ त्यांच्यामध्ये अरब लोकांना शिपाईवेषाने चाकरीस ठेवण्याचा प्रघात पडला. त्यांचा पगार मोठा, आणि खर्च कंजूषपणाचा असल्यामुळे ते अल्पावधीत व्याजबट्टा करूं लागले. खानदेशांतील त्यांच्या व्यवहारासंबंधानें क्याप्टन ब्रिग्ज ह्यांचा रिपोर्ट मनन करण्यासारखा आहे. थाळनेर, बेटावद, सिंधखेड, सोनगीर, सुलतानपूर, आणि नंदुरबार ह्या परगण्यांत खेड्याखेड्यांनी दोन अगर तीन अरबांचे ठाणे असे; आणि पुष्कळ दिवसांपूर्वी दिलेले कर्जाबद्दल ते दरमहा दरशेकडा ८|१० टक्के व्याज घेत. दुबळ्या खेडवळांवर जुलूम करण्यांत आणि त्यांचेकडून सोनेनाणे, जडजवाहीर जबरीने काढण्यांत ते आपलें शौर्य व शक्ति खची घालीत. त्यांच्या पेंढारीपणास कंटाळून अखेर कंपनी सरकारने त्या सर्वाला खानदेशांतून सुरतेस नेले, आणि जहाजांत घालून अरबस्तानांत रवाना केलें. ही कुलकथा सांगण्याचे कारण इतकेंच की, शंभर वर्षांपूर्वी अरबांनी ज्याप्रमाणे गांवढेकऱ्यांना हैराण केले तसेंच आज पठाण व पंजाबी व्यापारी दक्षिणप्रांती करीत आहेत पठाणांना रोहिले, काबुली, पेशावरी, खान, अफगाण, कंदाहारी, पशतुनी, पेशनी म्हणतात. ते आणि पंजाबी व्यापारी हे विशेषतः रोहिले, काबुली, भरेकरी किंवा दमकोंडे, ह्या नांवांनी प्रसिद्ध आहेत. असाम्यांकडे हे लोक पैसे मागावयाला गेले, आणि त्यांनी म्हटले दम धर म्हणजे ते थोडा वेळ नाक दाबून धरतात; म्हणून दमकोंडे हे त्यांचे नांव पडले. ते लालबुंद, सुरेख, पिळदार, सशक्त, सतेज, पुष्ट, उग्र व उंचे पुरे असतात. डांगाणांतले कोळी ठाकर म्हणतात की, ते साहेब लोकांचे कोणी तरी असावेत, आणि त्यांना सरकारचा हुकूम असावा; त्याशिवाय ते मारपीट करून देणे वसूल करतेना. असो. ते इकडील लोकांना कस्पटाप्रमाणे लेखतात, आणि लोकही त्यांच्या शीघ्रकोपी व क्रूर स्वभावाला आणि शरीरसामर्थ्याला भिऊन त्यांच्यापासून जरा लांबच राहतात. मराठी म्हण अशी आहे की, 'सावकाराचे उरावरून आणि सरकारचे पाठीमागून जावें.' पण दमकोंड्याचे