पान:गांव-गाडा.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १६५


घेतल्याशिवाय त्याने वसूल कां द्यावा ? खेड्यांतील उदमी म्हणजे लोकांचे सराफ, आडत्ये आणि आप्त होत. लोकांचें सुखदुःख, गरिबीहरिपी समजणे जितके त्यांना शक्य आहे तितकें बिछाइत्यांना नाही. दोन प्रहर रात्रीला कोणाला गरज लागली तर त्यांच्याकडेच गेले पाहिजे. आपला माल दूर देशी नेऊन विकणे खेडवळांना शक्य नसते. तो ते बहुतेक गांवचे वाण्यांनाच घालतात. खेड्यांतले बहुतेक लोक त्यांचे देणेदार असतात. हे सर्व मनांत आणून ते जर फुंकून खातील तर त्यांचाही धंदा चालेल, आणि लोकांनाही तकवा राहील. देशांत व्यापारवृद्धि झाल्यामुळे अलीकडे खेड्यांतील मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांशी व्यवहार आंखडता घेतला आहे; आणि ते आपलें भांडवल, आडत, जवाहीर, गिरण्या वगैरे सारख्या व्यापारांत घालूं लागले आहेत. परंतु झटपट श्रीमंत होण्याची हांव जर उदमी आंवरून धरतील, आणि रास्त नफा ठेवून धंदा करतील, तर खेड्यांची स्थिति सुधारून त्यांच्या भराभटीचे तेही वांटेकरी होतील. लोक सधन झाले म्हणजे दुकानदारी वाढते व त्यांची संपत्ति अनंतरूपांनी व्यापाऱ्यांच्या घरांत शिरते. तसेच हे लोक जर चोख हिशेब ठेवतील, तर त्याच्या व्यवहारासंबंधानें जिकडे तिकडे जे संशयाचें काहूर उठले आहे ते खात्रीने कमी होईल. पिके खंडून घेणाऱ्या देशी, परदेशी व्यापाऱ्यांच्या व्यवहाराबद्दल जरूर विचार केला पाहिजे. ह्यांना द्रव्यबल व माणूसबल असल्यामुळे ह्यांच्या केवळ फूत्काराने शेतकऱ्यांना कमीत कमी चौथाईला मुकावे लागते. ही गोष्ट काही लहानसान नव्हे. ह्याबद्दल लोकांत विचारजागृति होऊ लागली आहे, आणि हे व्यापारी प्रतिष्ठित असल्यामुळे ह्या बाबतींत उभयतांमध्ये फायदेशीर व सरळपणाचा मार्ग निघण्याची आशा आहे. पण ज्यांकडे डोळेझांक करणे आत्मघाती आहे, अशा पठाण व पंजाबी व्यापाऱ्यांबद्दल काळजीपूर्वक विचार चालू असल्याचे ऐकिवात नाही.

 मराठशाहीतल्या पडत्या काळांत जिकडे तिकडे गृहकलह माजला. आणि संस्थानिक व सरदार ह्यांस आप्तांचा देखील भरंसा येईनासा झाला;