पान:गांव-गाडा.pdf/182

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १६१

पण त्या परत येणें आतांशा मुष्कील असते. त्यांनीं जमिनी गहाण घेतल्या तर ते त्या गहाणदारांना किंवा इतरांना बटाईनें अगर खंडानें लावतात. मारुतीचे शपथेवर कर्ज, खंड, किंवा बटाई येत असे अशा काळांत व्याजबट्ट्यापासून जो धान्याच्या व कुळाच्या सेवेच्या रूपानें नफा मिळे, त्याच्या दंतकथा ऐकून हे लोक अजूनही कर्जदारांच्या थापांना भुलतात. परंतु कोळी, ठाकर, भिल्ल, वगैरे जंगली म्हणून कमी चौचाल जाति किंवा वऱ्हाड, खानदेशसारखे सुसंपन्न कुणबी ह्यांची वस्ती सोडून बाकीच्या ठिकाणीं किरकोळ अडाणी सावकार साफ फसतात. त्रागा करून, शिव्याशाप देऊन त्यांचें कर्ज वसूल होत नाही, व शेतमालही कुणबी त्यांच्या हातीं लागू देत नाहीं. कांहीं दिवस अंदर बट्टा सोसून हे लोक बहुधा मुद्दल रुपयांचे सहा तें बारा आण्यांवर आपले रोखे वाण्यांला बेचन करून देतात. हा वर्ग आता नामशेष होत चालला आहे. धान्याच्या वाढत्या किमतींनी हात दिल्यापासून तुरळक कुणबी व्याजबट्टा करूं लागले आहेत. त्यांचें कर्ज येण्याला खळखळ पडते, आणि बोलीप्रमाणें भरपूर वसूल त्यांना क्वचित मिळतो. व्यवसायधर्मीनुसार त्यांचा डोळा जमिनीवर असतो, म्हणून ते जमिनी गहाण घेतात आणि त्या घरी कसतात. कुणबीकींतले ते पोटकिडे असल्यामुळे त्यांना रोकड व्याजापेक्षां शेतवांट्यांत जास्त नफा भेटतो. कर्ज फुगवून कुळाची जमीन तोंडांत टाकावी अशी त्यांची मनांतून इच्छा असते. परंतु त्यांचा व्यवहार नात्यागोत्यांतल्या माणसांत बहुतेक झालेला असतो. तेव्हां मुरवतीखातर हातीं आलेली जमीन त्यांना सोडावी लागते. कुणबी तेथून जबरदस्त भिडस्त. एखादा बेमुरवत निघाला, तरी लिहिण्यावाचण्याचे अंग नसल्यानें, व कचेरीकोटांचे अडाखे माहीत नसल्यानें, त्याला जमीन जिंकणें कठीण पडतें. 'ज्या गांवच्या बोरी त्याच गांवच्या बाभळी.' तेव्हां असें हमेष घडतें कीं, वेळेला ह्या दोन्ही वर्गाच्या सावकारांवर कुळे कुरघोडी करतात; आणि त्यांचें व्याज दिसतांना जरी जबर दिसलें तरी