पान:गांव-गाडा.pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०      गांव-गाडा.

चालेल. शेतकन्यांकडील बिनतारणाचे कर्ज वसूल होण्याला फार जिकीर पडते, म्हणून बहुधा स्थावर तारण घेऊन सावकार त्यांना कर्ज देतात. खात्याच्या हिशेबाची व फेडीची जी अवस्था तीच दस्तैवजी देण्याच्या हिशेबाची व फेडीची. फुगलेला भरणा, जबर व्याज, 'माघ, फाल्गुुन, शिमगा, होळी, चैत्र एकूण महिने पांच ' असला हिशेब, आणि दिलेल्या वसुलाची नाकबुली-मिळून सर्व प्रकारे कुळाचें घर घेण्याला बाताबेताच्या भांडवलाचे सावकार सदैव तत्पर असतात. ह्याला अपवाद फार थोडे. ह्यामुळे प्रपंचाच्या व धंद्याच्या चालू खर्चासाठी काढलेल्या कर्जाखालीच गांवढेकरी दडपून जातात. तेव्हां धंदा वाढविण्यासाठी कर्ज काढून त्यांत नवीन भांडवल घालण्याचे अवसान त्यांना कोठून सांपडणार ? शेतीशिवाय तर धंदे खेड्यांत फारसे नसल्यामुळे अडाण्यांचे दस्तैवज बहुतेक प्रापंचिक खर्चासाठी झालेले असतात. कुणब्यांचे दस्तैवज मात्र धंद्यासाठी (उदाहरणार्थ बैल, बी, शेत घेणे, विहिरी, ताली करणे, इत्यादि) काढलेल्या कर्जाचे दिसून येतात. परंतु ज्याप्रमाणे रजिष्टरपुढे भरणा पदरांत घेऊन कचेरीच्या बाहेर ती रक्कम कूळ सावकाराला परत देते, त्याप्रमाणे कज्जा जिंकण्यासाठी वरील प्रकारची कारणे दस्तैवजांत फडकतात आणि शेकडा ६० व्यवहारांत ही कारणे वास्तविक नसतात. गरजवंताला अक्कल नसते. ऋणको म्हणतो कांहीही लिही पण माझी आजची नड वार. धनको म्हणतो मला कोर्टात ददात पडणार नाही असा दस्तैवज करून दे. खेड्यांत सावकारी करणारांचे साधारणतः पांच सहा वर्ग पडतील. थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे 'अडाणी' व सधन कुणबी, खेड्यांतील उदमी, मोठ्या भांडवलाचे सराफ, पिकें खंडून घेणारे एतद्देशी व परदेशी व्यापारी आणि अलीकडे गांवोगांव पैसा कापड वगैरे पेरणारे पठाण किंवा पंजाबी व्यापारी.

 थोड्याशा भांडवलावर व्याजबट्टा करणारे अडाणी बहुधा आशेखोर असतात, पण नेटदार नसतात. हे जातीने ब्राह्मण, सोनार, सुतार वगैरे असतात. व्याजाच्या आशेने ते लहानसान रकमा कर्जाऊ देतात,