पान:गांव-गाडा.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १५९

वाईट मालाचा बाजारांत पाऊस पाडीत आहेत, आणि अनाथ खेडवळांच्या पैशाचा व आरोग्याचा बळी घेत आहेत. खेड्यांच्या व्यापाऱ्यांनी आपसांत व्यापारी सभा स्थापून दुकानांत वाईट माल ठेवावयाचा नाही, असा आळा घातला तर शहरच्या उजळ ठकांच्या गमजा बंद पडतील, व त्यांना वाममार्गातून सोडविल्याचे श्रेय मिळवून आपल्या पिढीजाद अन्नदात्या गिऱ्हाइकाशी इमानेइतबारें वागल्याचे पुण्यही त्यांच्या पदरीं पडेल. खेड्यांत परप्रांतस्थ व्यापारी थोड्या भांडवलावर थोडक्या काळांत हवेल्या बांधतात, डागडागिना करतात; आणि पोटापाण्याचा उद्योग मिळत नाही म्हणून वरिष्ठ कनिष्ठ जातींतले लिहिणारे सवरणारे गांवकरी इकडे माशा मारीत बसतात. त्यांनी जर दुकानदारीत मन घातले तर ते स्वत: पोटभर खातील, आणि चोख माल चोख हिशेब ह्यांचा फायदा स्वकीयांना देतील. फायदेशीर रीतीने कोणता माल कोठे मिळतो, ह्याची माहिती पाहिजे असल्यास सेक्रेटरी इंडियन मर्चेट्स चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई, ह्यांच्यांशी पत्रव्यवहार करावा म्हणजे ती बसल्या जागी मिळेल. सरकारनेही खेड्यांच्या बाजारांतील मालावर पूर्ण नजर ठेवून मुक्या आंधळ्या पांगळ्या खेडवळांना व्यापारी स्वातंत्र्याच्या स्वैर व स्वार्थी दुरुपयोगापासून वाचवावें, आणि आई ना बाप अशी जी खेडवळ गिऱ्हाइकांची दैना झाली आहे, ती नाहीशी करावी.

 खेड्यांतील सावकारीला उचापतीच्या खात्यापासून आरंभ होतो. खावटीचे धान्य, कडबा, बैल, बी, प्रपंचाच्या नेहमींच्या नडी वगैरे संबंधाने जी उचापत होते ती सांचूं लागली म्हणजे हिशेब करून दस्तैवज करून देणे प्राप्त होते. ज्याच्याकडून कर्ज येण्यासारखे असते त्याला त्याच्या पतीप्रमाणे कर्जरोख्यावर दरसाल दरशेकडा ६ ते ३६ पर्यत व्याजाने कर्ज मिळते. त्यांतले त्यांत दोहोत्र्याचे दस्तैवज जास्त नजरेस येतात. शेतकऱ्यांना बिनव्याजी हप्तेबंदी मिळते, अशा समजुतीवर काहीं सावकार भरण्याच्या दुपटीचा दस्तैवज करून घेतात. हातावरील सावकारी फार करून संपुष्टांत आली आहे, असे म्हटले तरी