पान:गांव-गाडा.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५८      गांव-गाडा.

खोबरेल बायजाबाई पाटलिणीच्या अंगावर उतले किंवा त्यायोगें तिच्या डोक्याचे केश पार झडले, अगर भिमसेन महाराला खराब घासलेटच्या धुराने कफक्षय झाला, तर मुंबईच्या लक्षाधीश शेटचे किंवा युरोप-अमेरिकेच्या कोट्याधीश व्यापारी कंपनीचे काय जाते ? 'अर्थातुराणां न पिता न बंधुः।' पैशासाठी हपापलेल्या व्यापाऱ्यांच्या तावडीतून खेड्यांतले लोक वांचविणे अत्यंत अवश्य झाले आहे. ते खेड्यांच्या लोकांच्या माथीं जो खाण्यापिण्याचा लेण्यानेसण्याचा अपायकारक माल मारतात, त्याकडे पाहून असे उद्गार निघतात की, 'बाबांनो द्रव्यदंड घ्या पण देहदंड तरी घेऊ नका'. मुलगी देऊन जावयाला आणि ऋण देऊन कुळाला आयुष्य चिंतावे अशी आपली जुनी वहिवाट होती. ती जर आमचे व्यापारी चालविते, आणि गिऱ्हाइकाला टिकाऊ पथ्यकर माल पुरवून ते तगते व धडधाकट ठेवणे, व पेठेला सचोटीचें व परिणामी हितकर वळण लावणे, ह्याची वैश्यवर्णावरील जबाबदारी जर ते ओळखते, तर खेड्यांची दुकाने म्हणजे शहरचे उकिरडे अशी स्थिति होतीना. वजनामापांत, भावाटावांत, हिशोबांत खेड्यांतलें गिऱ्हाईक सर्वस्वी दुकानदारांच्या मांडीवर मान टाकतें. तेव्हां व्यापाऱ्यांचा निर्धार झाला की खोटा माल म्हणून आणावयाचा नाही, तर शेर अच्छेर मालासाठी किंवा १०।२० हात कापडासाठी गिऱ्हाईक मुंबई पाहून खोटा पण स्वस्ता माल घेऊन येईल, आणि त्यामुळे आपले नुकसान होईल, अशी भीति बाळगण्याचे कारण नाही. माल खरा पण महाग मिळू लागला म्हणजे फार तर गिऱ्हाईक तो कमी घेईल, आणि मितव्ययी होईल, इतकेंच. पण तें गांवचे दुकान सोडून जाईल असें सहसा होणार नाही. गिऱ्हाईक मितव्ययी झाले तर व्यापाऱ्यांचा कायमचा फायदा आहे. दुसरी गोष्ट अशी की, वाईट माल पैदा करणाऱ्या देशी परदेशी व्यापाऱ्यांची स्थिति कैफी माणसाप्रमाणे झाली आहे. जो जो वाईट माल खपतो तों तों तो अधिक अधिक वाईट पण स्वस्ता कसा बनवितां येईल ह्या विचारांत ते चूर होऊन गेले आहेत, व उत्तरोत्तर जास्त जास्त