पान:गांव-गाडा.pdf/177

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५६      गांव-गाडा.

 करड फूल घालणें, डिंकाला हिंगाचें पाणी देणें, नागवेलीच्या शेंगा पिंपळी म्हणून, बाळहिरडे सुरवर हिरडे म्हणून, काकवी मध म्हणून विकणें; वगैरे साधलें म्हणजे ते तृप्त असत. त्यांचें तांबे पितळ तेव्हांच बाहेर पडे. ह्या सर्व कारणांस्तव बाजारांत तकलादी जिन्नस, खोटा कुपथ्यकर व डौली माल कचितू येत होता; आणि बहुतेक किंमतीही पिढ्यानुपिढ्या कायम सारख्या होऊन बसल्या होत्या. धान्य स्वस्त, लोकांच्या गरजा अल्प, व दुकानदारही थोडे, म्हणून मालाचा उठाव बेताबातानें होई; आणि बाजारांत नाणें फारसें खेळत नसे. परंतु पाश्चात्य व्यापाराला हिंदीस्तान मोकळे झाल्यापासून ही स्थिति पालटली. एकछत्री राज्य, आगगाडी व तार ह्यांनीं व्यापाराला वेग दिला, व त्याचें स्थानिक स्वरूप जाऊन तो जगत्संचारी झाला; आणि माल व नाणें ह्यांची उलथापालथ वाढली. शेतमालाची विल्हेवाट वरचेवर लागते, आणि तो खेड्याच्या किरकोळ गिऱ्हाइकाला महाग मिळतो, इतकेंच नव्हे तर त्यांतला नामांकित माल जागेवरच्या गिऱ्हाइकाला मिळत देखील नाहीं. ज्याला शहरांत गिऱ्हाईक फार असा चांगला दाणा, चारा, फळफळावळ व शाकभाजी शहरांत जाते; आणि बटाटे पिकतात त्या गांवच्या लोकांना ते हवे असले म्हणजे ते परत शहरांतून आणण्याची पाळी येऊं लागली आहे. अशा रीतीनें शहरांत जों माल टाकाऊ ठरतो तो खेड्यांच्या पदरांत बांधला जातो. शहरच्या बेढंग्यांप्रमाणें तो परततांना जातां येतां वाटेवरच्या सर्व व्यापाऱ्यांचा नफा, भेसळ, लुच्चेगिरी यांसह खेड्यांत उतरतो. ह्यांमुळे तो नुसता महागच पडतो असें नाहीं, तर अनोळखी देशी परदेशी व्यापाऱ्यांना आपल्या हातचलाखीच्या आणि आधुनिक पाश्चात्य शोधांच्या व युक्त यांच्या साहाय्यानें तो जितका बेगडी करत येऊन गिन्हाइकाला लुबाडतां येईल तितका खोटा व भपकेदार बनून खेड्यांच्या दुकानांत घुसतो. ह्यामुळे खेड्यांत कुजकें कापड, किडका कमकस दाणाचारा, नासका भाजीपाला, राखेवजा साखर, पुनः पुनः पाणी शिंपलेला खजूर, विरी गेलेला चहा, खौट मसाला, साबण,