पान:गांव-गाडा.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुकानदारी.      १५५

परिणाम असा घडून येतो की, गांवढेकऱ्यांचे खातें पिढ्यानपिढ्या बेबाक होत नाही. मोठे दुकानदार किरकोळ दुकानदारांप्रमाणे अधीर होत नाहीत, आणि गिऱ्हाइकांची नड जाणून ती वेळेवर भागवितात. ह्यामुळे गिऱ्हाइकावर त्यांची छाप चांगली असते. एकंदरीत हिंग बोजवार विकणाऱ्यांपेक्षां भरण्याचे दुकानदार गिऱ्हाइकांशी वागण्यांत जरी प्रतिष्ठित असले तरी सचोटीने वागून गिऱ्हाइकाचा फायदा करावा अशी भावना त्यांमध्ये कचित् आढळून येते.

 तांब्याशिवाय चांदी नाद धरीत नाही, तशी खोट्याशिवाय दुकानदारी चालत नाही अशी आमच्या वैश्यांची जुनाट समजूत आहे. म्हणून आमचे दुकानदार गिऱ्हाइकांच्या डोळ्यांत धूळ टाकण्याला फार दिवसांपासून वहिवाटीने बांधले गेले आहेत!! बनिया मिंतर बेसा सती। बगळा भगत कागा जती। ही उक्ति प्राचीन काळापासून लोकांच्या तोंडी आहे. तरी पण सरडाची धांव अति झाली तर कुंपणापर्यंत असते. स्वराज्यांत कसब्यांचे व व्यापाऱ्यांचे दळणवळण दूरदेशी बेताबाताचे असल्यामुळे बहुतेक व्यापार स्थानिक असे; आणि हुन्नरी, व्यापारी व गिऱ्हाईक हे एकमेकांची ओळख व मोहबत धरीत. त्या भोळ्या काळांत खऱ्याखोट्याची भीति व अब्रूची चाड लोक अधिक बाळगीत. एकदां का कानफाट्या नांव पडले म्हणजे गिऱ्हाईक लागणार नाही, व उपाशी मरण्याची पाळी येणार; निदान चहूंकडे नाचक्की होणार, हे हुन्नरी व दुकानदार जाणून होते; आणि देशांतरीं माल नेण्याची साधने नसल्यामुळे हुन्नरी व व्यापारी लोकांना गिऱ्हाइकी जतन करणे भाग पडे. खोट्याचें बेमालूम खरे करून दाखविणारे, व नाना प्रकारच्या मिश्रणांची संपादणूक शक्य करणारे शास्त्रीय शोध आमच्या कसबी लोकांना ठाऊक नसल्यामुळे त्यांना मोठीशी व भानगडीची भेसळ किंवा लबाडी पचविण्याची आक्रमशक्ति नव्हती. फारतर खोबऱ्याच्या तेलांत थोडेंसें करडी तेल, करडीच्या तेलांत थोडेसे शेंगादाण्याचे तेल मिसळणे; गांवच्याच चार दोन राशींचे गहूं, जोंधळे कालविणे; केशरांत