पान:गांव-गाडा.pdf/175

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५४      गांव-गाडा.


पारख नीट होऊन, गुणी जनांना बक्षिसेंही खेड्यांपेक्षा अधिक देण्याला सवड सांपडेल. गुणोत्कर्षासाठी सबंध तालुक्याने वर्गणी करून शेतकाम, गुरेढोरें, तालुक्यांत होणारी कौशल्याची कामे ह्यांच्या प्रदर्शनाची अशा यात्रेला जोड दिली तर सिव्हिल व्हेटर्नरी ( गुरांचे वैद्यक), शेतकी, पतपेढ्या, ह्यांसारखी लोकोपयोगी खाती लोकांना जरूर ते ज्ञान देण्यासाठी तेथें विद्वान् व अनुभवशीर लोक पाठवितील, आणि यात्रेचे आद्य हेतु उत्कृष्ट रीतीनें सफळ होतील.

 दिवाळी-शिमग्यांसारखे सण आणि लग्नदिवसांसारखी कार्ये इत्यादि प्रसंगांचा बाजार करण्याला खेड्यांतले लोक बहुधा आपल्या गांवच्या किंवा आसपासच्या पेठेच्या मोठ्या दुकानी जातात. त्यांचा सर्व व्यवहार उधारीचा असतो,व दुकानदारांना आपल्या बाक्या येण्याला पुष्कळ वाट पहावी लागते. पावसाने लागोपाठ टाळा दिला तर सर्व बाकी वसूल होणे दुरापास्त होते, इतकेच नव्हे तर कधी कधी तिची आशाही सोडावी लागते. तेव्हां गांवढेकऱ्यांना स्वस्त दराने माल मिळणे एकीकडेच राहिले, पण आत्मसंरक्षणासाठी दुकानदार वेळेवर मालाच्या किंमतीच्या दुपटीच्याही रकमा नांवे मांडून ठेवतात. घी नो पैसा आणि पैशानु घी, हा अनुभव खेड्यांत सर्वत्र आहे. माल मिळतो तोपर्यंत आपल्या खात्याची स्थिति काय आहे ह्याचा विचार करणारे लोक खेड्यांतील लिहितां वाचतां येणाऱ्यांमध्ये देखील विरळा. मग निरक्षरांचे नांव कशाला ? त्यांनी आठवण ठेविली तरी एक लिखा आणि दस बका, अशी अवस्था होऊन शेटजीच्या वहीपुढे गप्प बसावे लागते. शेटजीचा एकच मंत्र 'नीट आठवण कर. हे लिहिलें तें खोटें का? दाखीव कोणालाही वही'. असल्या बोलाचालींत दुकानांत जमलेले लोक गिऱ्हाइकालाच फजीत करतात. खात्यांत वाटेल त्या रकमा व भाव घुसडण्यांत आणि दिलेला वसूल तोंडांत टाकण्यांत दुकानदाराचे इमानच काय त्याच्या लेखणीच्या आड येईल तेवढें. दुकानदार शेकडा पंचवीसच्या कमी नफ्याने माल मुळांत विकीत नाहीत, आणि त्यावर हे हिशेबाचे भोळे असते. ह्याचा