पान:गांव-गाडा.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३८      गांव-गाडा.

प्रसिद्ध केला, तर सामाजिक व धार्मिक इतिहासावर आणि रूढिबद्ध लोकाचारावर बराच प्रकाश पडेल, असें तज्ज्ञ श्रोत्यांचे मत झाल्यावांचून राहणार नाही. स्टेडसारख्या पंडितांनी पाळण्यांतल्या मुलांची कवनें व गोष्टी निरंतर संग्राह्य म्हणून संपादन केल्या आहेत. पुष्कळ कवनांतील कथाप्रसंग अनेकरसपरिपूर्ण आहेत. परंतु तेवढ्यासाठी ती घोकून ठेवणारांच्या पोषणाचा सामाजिक खर्च अतोनात होतो असे मोठ्या कष्टाने म्हणावें लागते. त्यांच्या पाठांतराचा संग्रह व प्रकाशन झाले म्हणजे मग त्यांच्या धंद्यांत तर बिलकुल हंशील राहणार नाहीं. वेद प्रसिद्ध झाले आहेत म्हणून वेदपठण करणाऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा देणे अनवश्यक आहे. अशी झालेली लोकप्रवृत्ति पुढे ढकलली म्हणजे वारकरी, कबीरपंथी, गोंधळी वगैरे प्रसिद्ध ग्रंथांतील अभंग, पदें, लावण्या पोवाडे म्हणणारांचे काम उरलें नाहीं असें होतें. भराडी, वासुदेव, गोसावी, बैरागी, पांगुळ, कानफाटे वगैरेंची कवनें व कथा प्रसिद्ध करण्यास सार्वजनिक वर्गणी केली, तर पुढील पिढीचा बराच खर्च वांचून ह्या भिक्षुकांना परवडेल तो उत्पादक धंदा करण्याचा रस्ता खुला करून दिल्याचे महत्कार्य होईल. अनेक महाराष्ट्रीय संस्थानिकांसमोर ह्या लोकांची, निदान तमासगीर बहुरूपी वगैरेंची दरसाल हजरी होत असते; व त्यांना इनाम, वर्षासनें, शिरपाव वगैरे बिदागी देण्यात येते. त्यांनी जर ह्या पद्धतीला व्यवस्थित स्वरूप दिले, आणि इंग्रज सरकाराच्या पुराणवस्तुसंशोधन खात्याप्रमाणे उपरोक्त वर्गातील यच्चयावत् लोकांच्या सांप्रदायिक विद्येचा संग्रह करण्याचे एखादें खातें काढले तर आपल्या देशबांधवांवर त्यांचे अनंत उपकार होतील ह्यांत संशय नाही. तरी संस्थानिकांनीही सहानभूतीने ह्या विनंतीचा विचार करावा. दुसऱ्या वर्गाचा म्हणजे चोरट्या भिकाराचा कोणालाच उपयोग नसून उलटा उपद्रव आहे. प्रतिष्ठित भिक्षुक बहुतेक यात्रेकरू म्हणून वावरतात. साधू-फकिरांच्या सर्व पंथांमध्ये जरी घरभरे आहेत, तरी वारकरी शिवायकरून बाकीच्यांमध्ये फार करून सडे लोकांचा भरणा विशेष असतो. काही तरी उद्योग करून दोन पैसे सांचवून