पान:गांव-गाडा.pdf/158

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १३७

रीघ नव्हती, तेथे मोठाली भगदाडे पाडली, व मानधनांच्या तोंडाला काळें फांसलें. आगगाडी नव्हती तेव्हां साधू लोक पायी प्रवास यात्रा करून ठिकठिकाणची माहिती व ज्ञान मिळवीत; आणि त्यांच्या औषधपाण्याचा व जडीबुट्टीचा लोकांना उपयोग होत असे असें म्हणतात. आतां हे लोक आगगाडीने इकडून तिकडे जातात, व त्यांना देशाचार पाहण्यास व वनस्पतींचे ज्ञान मिळविण्यास कांहीसुद्धां संधि सांपडत नाही. तरी आपले लोक अजून समजतात की, साधूंना किंवा त्यांच्या घरभऱ्या चेल्यांना पुष्कळ कळते. काही साधूंना अल्पस्वल्प शास्त्रीय क्रिया माहीत असतात. उदाहरणार्थ, कागदावर तुरटीने गाईचे किंवा चेटकीचे चित्र काढले तर तें एरवी दिसत नाही, कागद पाण्यात बुचकळला म्हणजे तें दिसते व साधूचा बोलबाला होतो. झाडे,धान्याच्या सुड्या व चाऱ्याच्या गंजा जाळण्याच्याही युक्त्या आहेत, आणि अरिष्ट-प्रतीति आली म्हणजे लोकांना खरेंच वाटते की, साधूचा शाप भोंवला. असल्या कृती शिकून आपलें ढोंग मातविण्यापलीकडे किंवा साधूंचे कपडे पांघरून गुन्हे करण्यापलीकडे बहुतेक आयतखाऊंस उद्योगच राहिला नाही, असें म्हटल्यावांचून राहवत नाही. ह्यांच्याच नांवानें तुकोबाराय हळहळतात की "बुडतसें जन देखवेना डोळा । म्हणूनी कनवळा येत असे ॥"

 गांवोगांव भटकणाऱ्या भिकाराचे ढोबळ मानाने तीन वर्ग पडतील. जोशी, वासुदेव, पांगूळ, भराडी, वाघे, तिरमल वगैरेसारखे भिक्षुक; चित्रकथी, मांगगारोडी, पारधी, माकडवाले, कैकाडी, वगैरे सारखे चोर भिक्षुक; आणि वारकरी, विकल (आधळेपांगळे, रोगी वगैरे ), गोसावी, बैरागी, मानभाव, फकीर वगैरे प्रतिष्ठित भिक्षुक. अनेक प्रकारचे गुन्हेगार लोक आपल्या सोयीप्रमाणे उपरोक्त तिन्ही वर्गाची सोंगें घेऊन आपला कार्यभाग साधितात, आणि भिक्षेत ऊर्फ धर्मात प्रपंच भागला नाहीं म्हणजे तिन्ही वर्गातील लोक कमीआधिक मानानें लांडीलबाडी व चोरीचपाटी करतात. पहिल्या वर्गातील लोकांची जी काय प्राचीन गाणी, कथा, पोवाडे, होरे, ठोके, बाण्या असतील, त्यांचा संग्रह करून