पान:गांव-गाडा.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६      गांव-गाडा.

तात. अभ्यास करून करूनही मनाची एकाग्रता होत नाही, तर ज्यांचा सर्व काळ भटकण्यांत, शिधा कपडा पैसा उकळण्यांत, व निशाबाजींत जातो, त्यांनी 'आमचा काळ आम्ही परमार्थाकडे वेचतों, तुम्ही जसा पोटाचा तसा आम्ही देवाचा उद्योग करतों, सर्वांनीच रोजगार करावा तर देवाची चाकरी कोणी बजवावी ?' इत्यादि बकावें,आणि लोकांनीही तें खरें मानावें; ह्यापेक्षा आमच्या विचारमूढतेचा खंबीर पुरावा दुसरा कोणताही असू शकणार नाही. बहुतेक साधु निवळ खाणेपिणे, गप्पागोष्टी, हुक्कापाणी ह्यांत काळ घालवितात. थोडेसे तुळसीदासाचें रामायण झुकत झुकत वाचतात किंवा ५ - ५० अभंग, दोहरे, पदें ह्यांची पोपटपंची करतात; आणि फारच छेडलें तर एकादा दुसरा एकादें ठराविक धर्मविषयक कोडे किंवा कूटप्रश्न अज्ञ जनांचे तोंडावर फेंकतो, व त्याचे ठराविक पद्धतीने निराकरण करतो, आणि त्यांकडून वाहवा मिळवितो. असल्या बऱ्हाणी साधूंना दान करून त्यांच्यामार्फत स्वर्गात दाद लावून घेण्याचा यत्न करणे म्हणजे वंध्यापुत्राची अपेक्षा करणे नव्हे काय ? गोसावी, बैरागी, फकीर गांवांत आले की गांवचे चंगीभंगी आपली बैठक बुवाजी किंवा साईजीजवळ घालतात, आणि त्यांचे प्रस्थ वाढवून आपणही चैन करतात. या वर्गातले साधू पहिल्याने गांवच्या अल्पवयी पण चैनी मुलांना गाठून त्यांना अमलाची चट लावतात, आणि तत्प्रीत्यर्थ त्यांकडून घरचे धान्य, वस्त्रे, किंचा पैसा ह्यांच्या लहानसान चोऱ्या करवितात. ह्यांच्या प्रसादानें गांजा-अफूचे व्यसन लागून पुढे चोर किंवा कफल्लक झालेल्या व कधी कधी प्राणासही मुकलेल्या तरुणांची उदाहरणे मागाल तितकी खेड्यांतून दाखवितां येतील. ह्याप्रमाणे गांवांवर चरतां चरतां हे लोक जर एकाद्या गांवीं स्थायिक झाले की ते गांवकऱ्यांच्या उतरंडी उतरूं लागतात. ह्यांच्या धुनीजवळ गांवगुंड पडलेले असावयाचे, आणि मग 'कुत्र्याचा पाय मांजरावर आणि मांजराचा पाय कुत्र्यावर' असे धंदे चालतात. अनेक ठिकाणच्या तरुण स्त्रिया-विशेषतः विधवा डबोल्यासह ह्या लोकांनी काढून नेल्या आहेत, आणि ज्या घरांत मुंगीला