पान:गांव-गाडा.pdf/156

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
फिरस्ते.      १३५

नाही तर तें नपुंसक होते आणि वंशखंड होतो. जन्मचे जन्म जातात तरी मोठमोठ्या पंडितांला धर्माचा सुगावा लागत नाही, परंतु आमच्यांत ज्याप्रमाणे बाहुलाबाहुलींची लग्ने होतात तशी लोकांच्या अज्ञानाचा व धर्मभोळेपणाचा फायदा घेऊन पाळण्यांत चिल्यापिल्यांना धर्मदीक्षा किंवा पंथदीक्षा देण्यात येते. असे मुंडलेले लोक पुढे कुसंगतीने दुराचारी होतात, आणि मुरळ्या, भाविणी ह्यांना तर पोटासाठी कसब करणे प्राप्त होते. परंतु अप्रबुद्धपणी गुरूचे चेल्यावर जुलूम वजन असते; व त्याला मायेंत घेण्यासाठी खाणे-पिणे, लेणे वगैरे हरएक बाबतींत चेल्याचे असे लाड चालतात, की कोणी पोटच्या पोराचे इतके कोड पुरवीत नसेल. मानभावांच्या मेळ्यांतले कड्यातोड्यांनी मढविलेले गोजिरवाणे 'बाळबोवा' पाहिले म्हणजे वरील विधानाची सत्यता पटेल.

 आईबापांचें पोट पिकण्यासाठी त्यांनी आमच्या जन्माचें मातेरें केलें अशी कबुली जेजुरीस भर खंडोबाचे देवळांत किती तरी मुरळ्या समजू लागल्यावर देतात. हजार साधूत नऊशेनव्याण्णव ज्ञानशून्य, व्यसनी, कोपिष्ट व लालची असतात, आणि त्यांच्या दुर्वासवृत्तीला भिऊन लोक त्यांना पोस-

-----

 १ एका मराठ्याच्या मुलाला लहानपणीच त्याच्या आईबापांनी गांवच्या भवाळाच्या ओटीत घातले, आणि तो त्याच्या घरी दळण, कांडण, शेणकुर, स्वैपाकपाणी करीत होता. सोळा सत्रा वर्षांचा झाला तरी त्याला धड बाळबोधही वाचतां येत नव्हते. त्याला एकाने म्हटले की, इतके काम केले तर तुला १०० रुपये साल कोठेही मिळेल. तो म्हणाला, 'बुवा बरा जाऊ देईल!' दुष्काळांत मुलीसह मानभावीण झालेल्या व पुढे मेळा सोडलेल्या एका बाईनें आपली आठ दहा वर्षांची केशवपन केलेली मुलगी मेळावाल्यांकडून परत मागितली. पण बुवा तिचे ऐकेनात.म्हणून तिच्याबरोबर गांवकरी मेळ्याचे मुक्कामाच्या जागी गेले, तो मुलीने उत्तर दिले की, 'आई मला जारकर्माला नेते, मी मेळा सोडून येत नाही.' असले डावपेंच धर्मातरांत नेहमी आढळतात, व हीच अवस्था सर्व प्रकारच्या धर्मदीक्षा व पंथदीक्षा दिलेल्या मुलामुलींची पर्यायाने असते, हे चाणाक्ष वाचकाला फोडून सांगणे नको.